पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ
एक कोटी शेतकर्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा
गोरखपूर : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. या वेळी बोलताना पंतप्रधानांनी जोरदार शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. शेतकर्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे निवडणुकीसाठी एकत्र येऊन महाभेसळ करणारे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थतेतूनच योजनेबद्दल अफवा पसरवण्याचे उद्योग सुरू आहेत, असे टीकास्त्र
मोदींनी सोडले. शेतकर्यांना उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्षी सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी मदत म्हणून कृषी निष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) खरेदीस लागणारी आर्थिक गरज भागावी आणि पिकांची योग्य निगा राखून फायदेशीर उत्पन्न मिळावे याकरिता ही
योजना आहे. किसान सन्मान योजनेसाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांनी शेतकर्यांची यादी केंद्राकडे सोपवली आहे; तर भाजप सोडून अन्य पक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांनी या योजनेसाठी अद्याप पात्र शेतकर्यांची यादी केंद्राकडे पाठवलेली नाही. यावरून पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. तुम्ही अन्नदात्या शेतकर्याच्या बाबतीत असे वागणार असाल; तर शेतकर्यांच्या शापाने तुम्ही उद्ध्वस्त व्हाल, असे मोदी म्हणाले. या सोहळ्यास केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मंत्री, नेतागण, अधिकारी उपस्थित होते.
-रायगडातील शेतकर्यांनाही लाभ उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ऑनलाईन वितरित केला आणि लगेचच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळ्यात सहभागी झालेले शेतकरी मदन दामोदर म्हात्रे (रा. झिराडपाडा, ता. अलिबाग) यांच्या मोबाईलवर दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे त्यांचा चेहरा आनंदाने उजळला.