जोहे, कळवे, तांबडशेत येथील कारागिरांचे नुकसान
पेण : अनिस मनियार – गेल्या चार-सहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील तांबडशेत, जोहे, कळवे येथील गणेशमूर्ती कारखाने व घरांमध्ये पाणी शिरले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.
पेण तालुक्यातील जोहे तलाठी सजामधील तांबडशेत, जोहे, कळवे या गावांत कच्च्या गणेशमूर्तीचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील गणेशमूर्ती कार्यशाळांमधे पुराचे पाणी शिरले. तांबडशेत गावात शनिवारी दिवसभर पुराचे पाणी शिरल्याने गावातील रस्ता पाण्याखाली गेला, तसेच रस्त्यालगतच्या मूर्तिकलेच्या कारखान्यात पाच फूट पाणी साचल्याने 18 ते 20 कारखान्यांतील गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गणेशोत्सव महिन्याच्या अंतरावर आला असल्याने घेतलेल्या ऑर्डर्स कशा पूर्ण करणार, या संकटात मूर्तिकार सापडले आहेत. शिवाय गावातील 25 ते 30 घरांत पाणी शिरून अन्नधान्य व कपडे तसेच इतर सामानाचे नुकसान झाले आहे. जोहे तलाठी बी. के. पाटील यांनी तांबडशेत गावापासून आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. जोहे व कळवे गावात पंचनामे सुरू करण्यासाठी तलाठी व कर्मचारी धावपळ करताना दिसत होते.
पाताळगंगा व बाळगंगा नद्यांच्या पुराचे पाणी घुसून या कलानगरीची मोठी आर्थिक हानी झाली आहे. या ठिकाणी 450 ते 550 कारखाने असून मूर्तींची संख्यासुध्दा लाखोंच्या घरात आहे. प्रत्यक्ष आर्थिक नुकसानीचा आकडा पंचनामे केल्यानंतर दिसून येईल, मात्र एका कारखान्याचे 30 ते 35 हजारांहून अधिक नुकसान झाले असल्याचे तलाठीवर्गाचे म्हणणे आहे.