महाड ः प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 20 मार्च रोजी होणारा महाडमधील चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सोमवारी (दि. 16) महाड प्रांताधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला बौद्धजन पंचायत समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व गटाचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे आंबेडकर चवळवळींतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यासह संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशावरून योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून 20 मार्च हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असला तरी कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे त्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी या वेळी केले. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह
केला. त्यानंतर हा दिन समता दिन म्हणून गेली अनेक वर्षे उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे. या वर्षी कोरोना विषाणूची दहशत संपूर्ण जगामध्ये परसरली असून शासनाने या विषाणूपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे निर्देश दिले असल्याचे प्रांताधिकारी इनामदार यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020पासून लागू करून खंड 2,3 व 4मधील तरतुदीप्रमाणे अधिसूचना निर्गमित केली आहे. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आल्याने 20 मार्च रोजी होणार्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहू नये, त्याचबरोबर नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे इनामदार यांनी सांगितले.