Breaking News

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ

मुंबई : प्रतिनिधी  – राज्यात 2014 साली 190 वाघ होते, ते वाढून आता 2019 मध्ये 312 इतके झाले असून, ही वाढ अंदाजे 65 टक्के आहे. स्थानिकांच्या सहभागातून वनविभागाने व्याघ्रसंवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 2006 साली 103 वाघ होते ते 2010 मध्ये वाढून 168 झाले. 2014 साली झालेल्या व्याघ्रगणनेत ही संख्या आणखी वाढून 190 झाली, तर मागील चार वर्षांत राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे 65 टक्के वाढ होऊन आता ही संख्या 312 इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वनविभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवताना मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. यामध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.

देशात मध्य प्रदेश राज्यात वाघांची संख्या 308 वरून 526 इतकी झाली असून, हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या 406 वरून 524 इतकी झाली आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला आहे. तेथील वाघांची संख्या 340 वरून 442 इतकी झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून, राज्यातील वाघांची संख्या 190 वरून 312 इतकी झाली आहे; तर पाचव्या स्थानावरील तमिळनाडूत वाघांची संख्या 229 वरून 264 झाली आहे.

देशात 2967 वाघ

भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्रगणना 2006 साली झाली तेव्हा देशात 1411 वाघ होते. सन 2010 साली दुसरी गणना झाली तेव्हा 1706, तर सन 2014 साली तिसरी गणना झाली तेव्हा देशात 2226 वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात 2967 वाघ झाले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply