उलवे : रामप्रहर वृत्त
मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांची वर्षा सहल यंदा रविवारी (दि. 28) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे येथे नेण्यात आली होती. ही सहल चांगलीच रंगली. आंतरराष्ट्रीय स्तराचे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहून पत्रकार व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. धो-धो कोसळणारा पाऊस आणि तरण तलावात डुंबण्याची मजा यामुळे सर्वांनीच सहलीचा मनमुराद आनंद लुटला. दुपारी या स्टेडियमचे जनक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी गप्पांचा फडदेखील जमला. 2008 साली जेथे माळरान होते. तेथे दूरदृष्टी असलेल्या रामशेठ ठाकूर यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या रूपात नंदनवन उभे केले, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. केवळ पनवेल अथवा आसपासच्या परिसरातील क्रीडापटूंनाच या स्टेडियमचा लाभ होत नाही, तर देशभरातून कोठूनही खेळाडू येथे सरावासाठी आल्यास त्यांना 35 ते 40 टक्के सवलतीच्या दरात स्टेडियम उपलब्ध केले जाते, तसेच त्यांच्या खाण्या-पिण्याचीदेखील उत्तम व्यवस्था केली जाते, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. विविध क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले असून ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदके मिळावीत म्हणून या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे प्रयत्न सुरू असल्याचे कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या विविध फलकांवरून दिसून आले. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला भेट दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. सायंकाळी शैलेंद्र सदानंद खोपकर आणि मैत्रेय देवदास मटाले यांनी गाणी गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. अध्यक्ष श्री. वाबळे यांनी मजेदार चार ओळी ऐकवल्या, तर विश्वस्त अजय वैद्य यांनी पत्रकारितेतील काही किस्से सांगितले. उपाध्यक्ष सुधाकर कश्यप यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी आभार मानले. सर्वश्री दीपक म्हात्रे आणि देवदास मटाले यांनी सहल यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.