खालापूर : प्रतिनिधी
माथेरानच्या पायथ्याशी असणार्या बोरगाव ताडवाडी (ता. खालापूर) येथील डोंगर भागातील जमिनीला तडे गेल्याचे गावकर्यांच्या लक्षात येताच त्यांच्यामध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार इरेश चप्पलवार, मंडळ निरीक्षक नितीन परदेशी, तलाठी मगदूम व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. आदिवासींना वाटप केलेल्या दळी जमिनी (सर्व्हे नंबर 19) ला उत्तर बाजूस अंदाजे एक किलोमीटर लांब व तीन फूट खोलीचा तडा गेला असल्याचे निदर्शनास येताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. ताडवाडीमध्ये 50 कुटुंब असून 230च्या आसपास लोकसंख्या आहे. याबाबत चौकचे मंडल निरीक्षक नितीन परदेशी यांनी पंचनामा केला असून, संबंधित जमिनीची पाहणी करून अहवाल देण्याचे निर्देश भूजल सर्वेक्षण यंत्रणेला देण्यात आले आहेत.