Breaking News

सिडको अर्बन हाट येथे श्रावण मेळा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

श्रावण महिना म्हणजे सणवार, उत्सवांचा व मांगल्याचा महिना. अशी श्रावण महिन्याची भारतीय संस्कृतीतील महती आहे. सुखावणारा पाऊस आणि हिरवाईचा शालू पांघरलेली धरती यामुळे ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ अशीच प्रत्येकाच्या मनाची अवस्था असते. श्रावण महिन्याचे औचित्य साधत सणवारांचा गोडवा वाढवण्यासाठी सिडको अर्बन हाट येथे 3 ते 18 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत श्रावण मेळा 2019चे आयोजन करण्यात आले आहे.

श्रावण मेळ्यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड, त्रिपुरा, तमिळनाडू, गोवा, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब अशा विविध राज्यांतील कारागीर व कलाकार सहभागी होणार आहेत. या मेळ्यामध्ये विविध प्रांतांतील कारागिरांनी तयार केलेल्या रेशमी व सुती साड्या, बेडशीट, पायपुसणी, फर्निचर, ड्रेस मटेरिअल, शर्ट, कुर्ता, चामडी बॅगा, चपला, पडदे, गालिचे प्रदर्शनार्थ मांडण्यात येणार आहेत.

गणपतीच्या पर्यावरणस्नेही मूर्ती हे या मेळ्यातील मुख्य आकर्षण असणार आहे. घराची सजावट करण्यासाठी विविध रंगांच्या मेणबत्त्या, वॉलपीस, कलाकुसर केलेली मातीची भांडीही उपलब्ध असणार आहेत. याशिवाय गालिचे, रग, सोफा, कुशन कव्हर यांसारख्या नित्योपयोगी वस्तुंसह कृत्रिम दागिने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

खवय्यांच्या रसनातृप्तीसाठी कोल्हापुरी, राजस्थानी, केरळी खाद्यपर्थांचे स्टॉल्स असणार आहेत. विविध प्रकारचे मसाले, लोणची, पापड असे घरगुती पदार्थही या वेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील.

वृक्षारोपण मोहीम

वृक्षारोपण मोहीम हे या वर्षीच्या श्रावण मेळ्याचे वैशिष्ट्य आहे. या मोहिमेतंर्गत भेट द्यायला येणार्‍या पर्यटकांना आंबा, पिअर, फणस, गुजबेरी अशा विविध रोपे लावण्याची संधी मिळणार आहे. वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी व्यवस्थापक, अर्बन हाट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कला मंच आणि एआय केंद्राचे उद्घाटन

मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply