Breaking News

रुग्णांच्या सेवेसाठी सुविधा व व्यवस्था

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पत्रकार परिषदेत माहिती

पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी आयोजित आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून, सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत, अशी माहिती बुधवारी (दि. 31) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाशिबिरात रुग्णांच्या सेवेसाठी संपूर्ण सुविधा व व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे हे विशाल महाशिबिर दरवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वी होईल, असा विश्वास या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेस महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष व मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, रायगड मेडिकल असोसिएशनचे पनवेल कार्यकारी समिती सदस्य डॉ. विशाल वाणी, सचिव डॉ. पुरुषोत्तम भोईर, भाजपचे पनवेल विधानसभा विस्तारक अविनाश कोळी आदी उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे सांगितले की, या महाशिबिरासाठी जे. जे. हॉस्पिटल मुंबई, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ, भारती विद्यापीठ खारघर, तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ, येरळा मेडिकल ट्रस्ट खारघर, साईड फस्ट केअर, नायर आय हॉस्पिटल, व्हिट सेंटर, श्री समर्थ कृपा ऑप्टिशियन आदी रुग्णालयांचे डॉक्टर्स, त्यांचे 400हून अधिक सहकारी, तसेच पक्षाचे एक हजारांहून अधिक कार्यकर्ते, ‘सीकेटी’चा स्टाफ यांचे सहकार्य लाभणार आहे.

तपासणी व औषधोपचाराबरोबरच रुग्णांसाठी न्याहारी, भोजन, वाहतूक आदी चोख व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णांच्या सेवेसाठी सुकाणू, स्वागत, डॉक्टर व वैद्यकीय आणि रुग्ण सहाय्यक समिती, परिवहन, भोजन, औषधे वाटप अशा 24 समित्या, तसेच वैद्यकीय तज्ञ, स्वयंसेवक सज्ज झाले आहेत, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगून आरोग्य महाशिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अरुणशेठ भगत यांनी सांगितले की, यंदाचे हे 12वे आरोग्य महाशिबिर आहे. या वेळी प्रमुख अतिथींसह कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांची उपस्थिती असणार आहे.

सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार्‍या या महाशिबिरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा एकूण 350हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहेत. महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, मधुमेह, नाक, कान व घसा, हाडांचे रोग, आयुर्वेद अशा विविध तपासण्यांसह औषधोपचार देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नेत्रतपासणी करून चष्मेवाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय ईसीजी तसेच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जयंत पगडे यांनी दिली.

याशिवाय 18 ऑगस्टला कृत्रिम अवयव अर्थात जयपूर फूट शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही या वेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply