Breaking News

बहुआयामी नेतृत्व

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला…

कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेतील उपरोक्त ओळी जीवनात कितीही संकटे आली आणि त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर, पण मी त्यातून पुढे मार्ग काढणार हे छातीठोकपणे सांगणार्‍या साहसवीराची प्रबळ इच्छाशक्ती अधोरेखित करतात. ध्येयवेडी माणसे अशाच प्रकारे अथक परिश्रमाच्या बळावर समाजासमोर आदर्श निर्माण करतात. याच पठडीतील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही अविचल ध्येयाने अनेक अडथळे पार करून यशोशिखर गाठले आहे  तेही निगर्वीपणाने. नगरसेवक, नगराध्यक्ष, विधानसभा सदस्य, भाजप जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष अशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतलेली भरारी थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत असताना ज्यांच्यामुळे आपण इथवर पोहोचलो त्या जनताजनार्दनाला त्यांनी विकासरूपी भरभरून दान दिले. म्हणूनच सुज्ञ जनताही त्यांना सातत्याने विजयी करून केलेल्या कामाची पोचपावती देत असते. सजग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. पनवेलचा भव्य उड्डाणपूल, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, जिल्हा व सत्र न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर, निर्माणाधीन प्रशासकीय भवन यांसारख्या वास्तू त्यांच्या उत्तुंग कार्याची साक्ष देतात. केवळ शहरीच नाही, तर ग्रामीण भागाचाही त्यांनी कायापालट केला. पनवेल तालुक्यातील अनेक गावे, वस्ती, वाड्या विकासापासून वंचित होत्या. त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

महाभारतात भगीरथाने अपार कष्ट करून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली होती. तशाच प्रकारे अहोरात्र मेहनत घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये विकासाची गंगा आणली. जे जे काही चांगले इतरत्र आहे ते पनवेलमध्ये यावे असा त्यांचा अट्टाहास असतो. मुळात विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. त्यादृष्टीने ते नियोजन करीत असतात. त्यात प्रत्येक वेळी लगेचच यश मिळते असे नाही, पण त्यांचे प्रयत्न कधी कमी पडत वा संपत नाही. जिद्द व चिकाटीने ते अखंडपणे कार्यरत असतात.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांची आधी भाजप रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कामाच्या कक्षा रूंदावल्या. मुंबई, नवी मुंबईसह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये त्यांना वारंवार जावे लागते, तर दुसरीकडे पनवेलमध्ये भेटायला आलेल्यांना वेळ द्यावा लागतो. वाढलेली जबाबदारी आणि समाधानाची शाश्वती यामुळे साहजिकच त्यांच्याकडे कामे घेऊन येणार्‍या लोकांची संख्याही वाढली आहे. प्रत्येकाचे काम निरनिराळे असते. काही वेळा ते क्लिष्टदेखील असते, पण कामाचा रेटा प्रचंड प्रमाणात वाढूनदेखील आमदार महोदय चित्त शांत ठेवून विषय नीट समजून घेतात व तो मार्गी लावतात. एखादे काम होण्यासारखे नसेल किंवा जागा कमी आणि उमेदवार जास्त अशी स्थिती असेल, तर समोरच्याला ते तसे स्पष्टपणे सांगतात. त्याच वेळी सुयोग्य पर्यायही सूचवितात, मात्र उगाच न पाळता येणारे आश्वासन देऊन ते कुणाला झुलवत ठेवत नाहीत.

राजकारणी मंडळी कला, क्रीडा, साहित्य अशा प्रांतांमध्ये रमतातच असे नाही, परंतु आमदार प्रशांत ठाकूर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा मुक्तसंचार असतो. विशेष म्हणजे नवे काही शिकण्यात, जाणून घेण्याकडे त्यांचा कल असतो. राजकीय सभा असो वा साहित्यिक संमेलन तिथे ते एकरूप होतात; नव्हे तर आपल्या अमोघ वक्तृत्वाने व्यासपीठ अन् श्रोतुवर्गाला जिंकून घेतात.

पनवेल शहराचे एव्हाना महानगरात रूपांतर झाले आहे. मोठ्या प्रमाणात विस्तारणार्‍या पनवेल परिसरात विविध मोठ-मोठे व महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारत आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांना त्यात प्राधान्य मिळावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सदैव आग्रही असतात. एकीकडे सिडको अध्यक्ष म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करताना दुसरीकडे नवनव्या प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना नोकरी-व्यवसायाची संधी कशी मिळेल, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर हे नावाप्रमाणे प्रशांत महासागरासारखी अथांग वाटचाल करीत आहेत. आज राजकीय परिस्थिती अनुकूल आहे, पण यापूर्वी प्रतिकूल स्थितीत त्यांनी घेतलेल्या श्रमांना तोड नाही. अजूनही बराच टप्पा गाठायचा बाकी आहे, हे ठावूक असल्याने ते संयमीपणे मार्गक्रमण करीत आहेत. अशा या संवेदनशील नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

-समाधान पाटील, पनवेल

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply