पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम
स्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. या स्पर्धेला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे स्पर्धा कोकण व मुंबईपुरती मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली, तसेच बक्षिसांच्या रकमेतही भरघोस वाढ करण्यात आली आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी 14 व 15 डिसेंबर रोजी पुण्यातील निघोज येथील निघोजकर मंगल कार्यालयात आणि 19 ते 22 डिसेंबरपर्यंत पनवेल खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय येथे होणार असून, अंतिम फेरी 3 व 4 जानेवारी 2020 रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रमुख कार्यवाह तथा नियामक मंडळ सदस्य शामनाथ पुंडे (9821758147), संकेत मोडक (8411845445), गणेश जगताप (9870116964), अमोल खेर (9820233349) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
-अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना यांसह प्राथमिक फेरीतील सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper