पनवेल : रामप्रहर वृत्त
विवाहाचा सुवर्णमहोत्सवी अर्थात 50वा वाढदिवस दाम्पत्याच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा आणि यशस्वी जीवनाच्या वाटचालीतील सुवर्णक्षण असतो. त्यामुळे 50वा विवाह वाढदिवस म्हणजे एक सोहळाच असतो व तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण पनवेलमधील के. जी. म्हात्रे व त्यांच्या सुविद्य पत्नी उर्मिला म्हात्रे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाहाचा वाढदिवस उत्सव म्हणून साजरा न करता 50 हजार रुपयांची आर्थिक मदत महापौर सहाय्यता निधीस देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
पनवेल पंचायत समितीतून कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले व सध्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले के. जी. म्हात्रे व त्यांच्या पत्नी पनवेल नगर परिषदेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे या उभयतांच्या विवाहास 50 वर्षे झाली.
त्यांनी लग्नाचा हा वाढदिवस साजरा न करता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान म्हणून स्वतः 50 हजारांची मदत महापौर सहाय्यता निधीत दिली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हात्रे यांनी मदतीचा धनादेश बुधवारी (दि. 13) पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी म्हात्रे यांचे चिरंजीव रोहितही सोबत होते.
Check Also
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …
RamPrahar – The Panvel Daily Paper