Breaking News

पनवेल मनपाची परिवहन सेवा

तीन वर्षांत बसेस धावणार; विविध विषयांवर महासभेत साधकबाधक चर्चा

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका तीन वर्षांत स्वत:ची परिवहन सेवा सुरू करणार आहे. याबाबतची माहिती सोमवारी (दि. 19) झालेल्या महासभेत देण्यात आली. सर्व सदस्यांनी त्या निणर्याचे स्वागत केले. सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली ही सभा सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालली. उरलेले विषय विशेष सभेत घेण्याचे ठरले.  

पनवेल महापालिकेची महासभा सोमवारी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रश्नोत्तराच्या तासात नवी मुंबई महापालिकेच्या बससेवेमध्ये पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत नवी मुंबईच्या महापौरांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ नेण्याचे ठरले. या वेळी पनवेल महापालिका तीन वर्षांत स्वत:ची परिवहन सेवा सुरू करेल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

डॉ. अरुणकुमार भगत यांनी महापालिका हद्दीत स्वाइन फ्लू फैलावत असताना याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. नरवडे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महापालिका हद्दीत 10 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, डॉक्टर आणि कर्मचारी मिळाल्यावर  आणखी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या लक्षवेधीवरील चर्चेत आरती नवघरे, नितीन पाटील, मनोज भुजबळ, सुरेखा मोहकर आणि निलेश बावीस्कर यांनीही भाग घेतला.

महापालिकेचे आपत्कालीन अधिकारी राणे हे पूर आला त्या वेळी कोठे होते, असा सवाल सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीत पूरप्रतिबंधक योजना करण्याबाबत चर्चा करताना उपस्थित केला. या वेळी 39 ठिकाणी पूरप्रतिबंधक उपाययोजना करण्यास मंजुरी देण्यात आली. या चर्चेत सदस्यांनी आपापल्या प्रभागातील पूरपरिस्थिती कशामुळे झाली त्याची माहिती दिली. प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी नवीन पनवेलच्या सेक्टर 15मध्ये श्रेयस हॉस्पिटल येथील नाल्याजवळील गटार अरुंद असल्याने थोडा पाऊस झाला की तेथे पाणी साचते. त्यामुळे तेथील गटार रुंद करण्याची मागणी केली. 

पर्यावरणाचा सद्यस्थितीबाबतचा सन 2018-19चा मुंबई विद्यापीठाने तयार केलेला अहवाल सोमवारच्या महासभेत सभागृहासमोर ठेवण्यात आला. या वेळी विद्यापीठातर्फे डॉ. एस. के. काठे यांनी त्याचे सादरीकरण केले. या अहवालावर सदस्यांनी सूचना केल्या.

पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नवीन सदस्यांची नेमणूक या सभेत जाहीर करण्यात आली. वाहतूक पोलिसांना महापालिकेकडून ट्रॅफिक वार्डन देण्याला मंजुरी देण्यात आली. याशिवाय महापालिका हद्दीत आवश्यकतेनुसार शौचालय बांधण्यास मंजुरी देण्यात आली. या वेळी कोंढाणे धरणाची मालकी मिळण्याबाबतचा विषय विशेष सभेत घेण्याचे ठरले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply