Saturday , December 3 2022

निवडणूक हरल्याच्या रागात दोघांना बेदम बदडले

कर्जत : बातमीदार :

आपल्या उमेदवाराला मतदान न केल्याने त्याला पराभूत व्हावे लागले. या गोष्टीचा राग येऊन दोघांना बेदम बदडल्याची घटना  बार्डी गावात घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश शिवाजी कांबरी हे बार्डी (ता. कर्जत) येथील शिवसृष्टी हौसिंग सोसायटीमध्ये पहारेकर्‍याचे काम करतात. त्याच सोसायटीमध्ये झुंबरलाल विश्राम राठोड राहतात. त्यांनी आपल्या उमेदवाराला मतदान केले नाही, असा प्रसाद दत्तात्रेय कांबरी, दर्शन दत्तात्रेय कांबरी यांचा समज झाला होता. पहारेकरी गणेश कांबरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 मिनिटांनी ते जलकुंभामध्ये पाणी सोडण्यासाठी आले होते. त्यावेळी प्रसाद आणि दर्शन कांबरी राठोड यांना मारहाण करीत होते. त्यामुळे येथील काव्या किराणा दुकानाचे मालक मंगेश कांबरी यांनी राठोड यांना त्यांच्या तावडीतून सोडवून आपल्या दुकानात घेऊन गेले. हा सगळा प्रकार फिर्यादी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करीत होता. ते पाहून प्रसाद कांबरी, दर्शन कांबरी, भगवान कांबरी, तानाजी  कांबरी, विश्वास लोभी, समाधान थेर, जयवंत लोगले यांनी फिर्यादी यांना शूटिंग कशाला काढतोस असे म्हणून त्यांनाही लाथाबुक्क्याने मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी  दाखल केलेल्या तक्रारीवरुन कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply