मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा
बडोदा : वृत्तसंस्था
रिषी धवनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर हिमाचल प्रदेशने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेण्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात महाराष्ट्रावर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह हिमाचल प्रदेशने गुणतालिकेत 16 गुणांनिशी दुसरे स्थान पटकावत बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वप्नील गुगळे (16) आणि ऋतुराज गायकवाड (33) यांनी महाराष्ट्राला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर केदार जाधव (16) आणि अझिम काझी (17) फलंदाजीला असेपर्यंत महाराष्ट्राची अवस्था 3 बाद 84 अशी होती, पण त्यानंतर धवन आणि पंकज जैस्वाल यांच्या मार्यासमोर महाराष्ट्राला 9 बाद 117 धावाच करता आल्या. धवनने तीन, तर जैस्वालने दोन बळी टिपले.
महाराष्ट्राचे 118 धावांचे माफक आव्हान पार करतानाही हिमाचल प्रदेशची अवस्था 5 बाद 26 अशी झाली होती. मध्यमगती गोलंदाज प्रदीप दाढे याने लागोपाठच्या चेंडूंवर दोन बळी मिळवत महाराष्ट्राला या सामन्यात पुनरागमन करून दिले होते, पण धवन आणि आयुष जमवाल यांनी सातव्या गड्यासाठी 71 धावांची अभेद्य भागीदारी रचत हिमाचल प्रदेशला विजय मिळवून दिला. हिमाचलने हे उद्दिष्ट 18.5 षटकांत पार केले. धवनने 48 चेंडूंत सात चौकार आणि एक षटकारासह नाबाद 61 धावा फटकावल्या. जमवालने नाबाद 27 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : 20 षटकांत 9 बाद 117 (ऋतुराज गायकवाड 33, अझिम काझी 17; रिषी धवन 3/22) पराभूत वि. हिमाचल प्रदेश : 18.5 षटकांत 6 बाद 121 (रिषी धवन नाबाद 61, आयुष जमवाल नाबाद 27; अझिम काझी 2/10)