Breaking News

टीम इंडियाविरुद्ध विंडीजची ‘कसोटी’

आजपासून पहिला सामना

अँटिग्वा ः वृत्तसंस्था

ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आता वेस्ट इंडिजसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. गुरुवार (दि. 22)पासून सुरू होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका यजमान विंडीजसमोर पत वाचविण्याची अखेरची संधी आहे. विशेष म्हणजे ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोडणारी आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज 1948मध्ये प्रथम एकमेकांना भिडले होते आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-0 अशी बाजी मारली होती. त्यानंतर भारताला सलग चार मालिका गमवाव्या लागल्या. 1971मध्ये सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना भारताला वेस्ट इंडिजवर पहिला कसोटी विजय मिळवून दिला. त्यानंतर भारताने मालिका 1-0 अशी जिंकली. यानंतर दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेचा निकाल समसमान राहिला, परंतु जेतेपदाचे पारडे अनेकदा भारताच्या बाजूने राहिले.

मे 2002नंतर वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध कसोटी सामनाच नव्हे; तर मालिकाही जिंकता आलेली नाही. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांना हा कटू इतिहास पुसण्याची संधी आहे. दोन देशांमध्ये आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी 30 सामने विंडीजने, तर 20 सामने भारताने जिंकले. उर्वरित 46 सामने अनिर्णित राहिले.

विराटला विक्रम खुणावतोय

भारताचा कसोटी कर्णधार या नात्याने महेंद्रसिंह धोनीच्या सर्वाधिक विजयांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी विराट कोहलीला एका विजयाची आवश्यकता आहे. भारताला कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थानी नेत धोनीने कर्णधार या नात्याने 60 सामन्यांमध्ये 27 विजय मिळविले होते. कोहलीने नेतृत्वाची धुरा घेतल्यानंतर भारताने 46 सामन्यांमध्ये 26 विजय मिळवले आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply