दोन गोविंदांसह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ
अलिबाग, खालापूर : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 24) दहीहंडीला गालबोट लागले असून, दोन गोविंदांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
खालापूर तालुक्यातील चौक येथील नवीन वसाहतीमध्ये दहीहंडीचा दोर बांधलेला पिलर अंगावर पडून उभ्या असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
शुभम दत्तात्रेय मुकादम (19) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, अजिंक्य विक्रम मोरे (25) जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. हे दोघे दहीहंडीचा थरार बघत असताना हंडीसाठी दोर बांधलेला बांधकामाचा पिलर त्यांच्या अंगावर पडला. त्यामुळे जखमी झालेल्या दोघांना चौक येथील साई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर चौक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले, मात्र डोक्याला दुखापत असल्याने उपचार सुरू होण्याअगोदरच शुभमचा मृत्यू झाला, तर अजिंक्यवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, खालापूर दुर्घटनेच्या नावाने सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, मात्र तो तेथील नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. अधिक माहिती घेतली असता तो दहिसर मोरी येथील असल्याचे स्पष्ट झाले.
दुसर्या घटनेत तळा तालुक्यातील कासेवाडी येथील विजय कृष्णा दर्गे (53) यांचा मिठागर नदीत बुडून मृत्यू झाला. दर्गे हे दहीहंडी फुटल्यानंतर आपल्या गोविंदा पथकातील सहकार्यांसोबत जवळच असलेल्या मिठागर नदीत निर्माल्य सोडण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांनी पाण्यात उडी मारली असता त्यांचा बुडून मृत्यू झाला.
याआधी म्हसळा तालुक्यातील खसरई येथे दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून पडून अर्जुन लक्ष्मण खोत (24) या तरुणाचा मृत्यू झाला होता.