कर्जत : बातमीदार
शाळेची फी भरली नाही म्हणून नेरळ येथील एलएईस शाळेतील 200 विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या बाबत कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे दाद मागूनही कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक शाळेच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
शाळेची फी भरली नाही, म्हणून नेरळ येथील लॉर्ड अय्यपा इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापने 200 हुन अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. तर काही विद्यार्थ्यांना मागील वर्गातून पुढील वर्गात घातलेच नसल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सागितले. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या शाळेच्या 15 टक्के फी कपातीवरदेखील पालकवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जत हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात नोकरदार जास्त प्रमाणात असून सध्या कोरोनामुळे ते सारेच अडचणीत सापडले आहेत. सर्वांची आर्थिक गणित बिघडली असून अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शाळेची फीदेखील भरता येत नाही.
नेरळ येथील एलएईएस शाळेने फी भरली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले आहे.त्याबद्दल पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली होती. परंतु काही मार्ग निघत नसल्याने पालकांनी गटशिक्षण अधिकार्यांकडे आपली व्यथा मांडली होती. याबाबत कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे तसेच शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
दरम्यान, आता 23 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे फी न भरणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसता येईल का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.