आरोपीस दोन वर्षांचा कारावास, 20 हजार रुपयांचा दंड
खालापूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी खालापूर न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी प्रकाश बबन आखाडे (42) याला दोषी ठरवत दोन वर्षे कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. खोपोली वासरंग येथील चाळीत भाड्याने राहणार्या प्रकाश बबन आखाडे (मूळ रा. मावळ, पुणे) याने 8 ऑगस्ट 2015 रोजी दरवाजावर लावलेल्या भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेल्या सर्व टाईल्सची मोडतोड करून त्या फेकून दिल्या होत्या. याबाबत सुमन कांबळे (रा. खोपोली) आणि अनंत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश बबन आखाडे याच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 295, 427नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी खालापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील सतीश नाईक यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्षीदार व पुरावा ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरविले आणि आरोपी प्रकाश बबन आखाडे याला दोन वर्ष कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.