नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येथील त्यागराज क्रीडा संकुलात झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील सोमवारच्या (दि. 26) पहिल्या सामन्यात चढाईपटू विकास खंडोलाच्या अप्रतिम चढायांच्या बळावर हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 36-33 अशी मात केली. दुसर्या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणला 35-30 असे पराभूत केले.
विकासने चढायांचे 11 गुण मिळवले. त्याला विनयने नऊ गुण मिळवून सुयोग्य साथ दिली. विकासने प्रो कबड्डीच्या इतिहासात एकाच सामन्यात चढायांचे 10 गुण मिळवण्याची किमया दहाव्यांदा साधली. बंगालच्या मणिंदर सिंगने चढायांचे 15 गुण कमावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. या विजयासह हरियाणाने 10 सामन्यांतून सहा विजयांच्या 31 गुणांसह गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले. त्यांनी यू मुंबाला (29 गुण) तूर्तास मागे टाकले, तर बंगालने (34 गुण) दुसर्या स्थानावरील जयपूर पिंक पँथर्सला (37 गुण) मागे टाकण्याची संधी गमावली.
यूपीची पुण्यावर मात
दुसर्या सामन्यात श्रीकांत जाधवच्या चढायांच्या 15 गुणांमुळे यूपी योद्धाने पुणेरी पलटणवर 35-30 असा विजय मिळवला. मध्यंतरालाच यूपीने 16-9 अशी आघाडी मिळवली होती, परंतु पुण्याच्या मनजीतने चढायांचे 16 गुण मिळवल्यामुळे सामन्यात एकवेळ 20-17 अशी चुरस निर्माण झाली, पण दुसर्या सत्रात यूपीने जोरदार मुसंडी मारून पुण्याला मागे टाकले. मनजीतने या सामन्यादरम्यान प्रो कबड्डीतील चढायांच्या 300 गुणांचा टप्पाही गाठला, मात्र त्याची एकाकी झुंज पुण्याला विजयी करण्यात अपयशी ठरली.
RamPrahar – The Panvel Daily Paper