- दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत
- एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट रक्कम
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांत राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 10) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले.
या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपापली जबाबदारी गांभिर्यपूर्वक बजावावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत अतिवृष्टीग्रस्तांसाठी प्राधान्याने निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून एनडीआरएफतर्फे मिळणार्या नुकसानभरपाईच्या दुप्पट भरपाई शेतकर्यांना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे दोन हेक्टरची असलेली मर्यादा आता तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.
याशिवाय कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
देण्यात आली. या प्रकल्पाचा मूळ खर्च 23 हजार 136 कोटी होता तो आता 33 हजार 405 कोटी 82 लाख रुपयांचा होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता केंद्रास विनंती करण्यात येत आहे.
रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रत्नागिरी शहर हे कोकणातील उच्चशिक्षणाचे देखील प्रमुख केंद्र आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असून लोकसंख्या 16.96 लाख आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच निर्माण करण्यात येणार्या श्रेणीवर्धित जिल्हा रुग्णालयाचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याची वैद्यकीय व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.