Monday , January 30 2023
Breaking News

कळंबोलीत वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

पनवेल : बातमीदार

कळंबोली पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवून 29 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना कारवाई करण्यास विरोध करणार्‍या दोन वाहनचालकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

कळंबोली परिसरातील रस्त्यांवर अनेक ट्रेलर, ट्रकचालक आपली वाहने बेकायदा उभी करत असल्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होऊन या भागातील अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे या वाहनांचा त्रास होत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सोसायट्यांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन कळंबोली पोलिसांनी परिमंडळ-2चे पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांच्या सूचनेनुसार दोन विशेष पथक तयार केले.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश नाईक व 30 पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने बुधवारी रोडपाली गाव व परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने उभ्या असलेल्या 29 वाहनांवर व वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान रोडपाली येथील ट्रेलरवरील दोन चालकांनी कारवाई पथकातील पोलिस कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून कारवाईस प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी बलविंदर रतन सिंग (32) व मलकित रतन सिंग (25) या दोन वाहनचालकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी ट्रक टर्मिनल चालक-मालक संघटनेची पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने आपली वाहने उभी करू नयेत, असे आवाहन केले आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply