गडचिरोली : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक मार्ग बंद पडून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान-मोठे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली गेल्याने सुमारे 300 गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे, तर या पुरात जिल्ह्यातील तीन जण वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
– भामरागडमध्ये पूर
छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने पाणी शहरात घुसले आहे. या पुरामुळे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली आहेत, तर सहाशेच्या वर गावकर्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रविवारी (दि. 8)ही पावसाच्या सरी कोसळत होत्या.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी हेलिकॉप्टरमधून पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. (अधिक वृत्त पान 2 वर..)
कोल्हापूरमध्ये पुन्हा पुराचे संकट
कोल्हापूर : प्रतिनिधी
गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांचे संसार उद्द्धस्त झाले. कोल्हापूरकर यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच, पुन्हा पुराचे संकट घोंघावत आहे. कोल्हापुरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला असून, पुराची भीती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहत आहेत, तर 67 बंधारेही पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून 8540 क्युसेक्स, कोयनेतून 70404 क्युसेक्स, तर अलमट्टीमधून 182000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवर पोहोचल्याने संभाव्य पूरबाधित गावांतील नागरिकांच्या स्थलांतराची तयारी प्रशासनाने केलीय.