Breaking News

…अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करू!

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचा गर्भित इशारा  

पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील साहेबांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले पाहिजे; अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा गर्भित इशारा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने जासई येथे झालेल्या बैठकीतून शासनाला दिला आहे. ’आता शांततेचा मार्ग नाही’ अशी रोखठोक भूमिका घेण्याबरोबर ’येईल तो आपल्यासोबत नाही येईल त्याच्याशिवाय हा लढा’ अशी वज्रमूठ आवळत ‘दिबां’च्या नावासाठी काहीही करण्याची तयारी या बैठकीत स्पष्टपणे दिसून आली.
जासई हायस्कूलच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. 21) सायंकाळी झालेल्या या बैठकीस लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, कार्यकारिणी सदस्य उद्योजक जे. एम. म्हात्रे, जे. डी. तांडेल, सरचिटणीस भूषण पाटील, सहचिटणीस सुरेश पाटील, दीपक म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती नरेश घरत, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील, साई संस्थानचे विश्वस्त रवी पाटील, नाथा पाटील, निलेश पाटील, गुलाब वझे, संतोष केणे, माजी उपमहापौर व नगरसेविका चारुशिला घरत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, मनोज भुजबळ, अजय बहिरा, अभिमन्यू पाटील, तेजस कांडपिळे, विकास घरत, विजय चिपळेकर, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, संतोषी तुपे, मेघनाथ म्हात्रे, राजेश गायकर, दिलीप पाटील, संजय ठाकूर, यशवंत घरत, माणिक म्हात्रे, संतोष घरत, विनोद म्हात्रे तसेच रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई येथील विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भूमिपुत्रांचे कैवारी दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे अशी आग्रही आणि ठाम भूमिका येथील प्रकल्पगस्त शेतकरी, स्थानिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्या अनुषंगाने जासई येथे चौथी बैठक झाली.
 पुढील बैठकीत आंदोलनाची रणनीती आणि यामध्ये प्रकल्पग्रस्त 95 गावांचा समावेश करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. 24 जूनला होणारे आंदोलन ’अभी नही तो कभी नही’ ही भूमिका घेऊन करण्याचे या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले. त्यानुसार लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आला. त्या अनुषंगाने रणनीतीची बैठक येत्या रविवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता पनवेलमधील महात्मा फुले सभागृह (आगरी समाज हॉल) येथे होणार आहे.
या वेळी दशरथ पाटील यांनी ‘दिबां’चे नाव विमानतळाला देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी पत्रव्यवहार करून भेटीची वेळ मागितली होती, मात्र अद्यापही या मंडळींनी त्यावर वेळ दिली नाही, दखलही घेतली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, पत्रव्यवहार करूनही वेळ दिली जात नाही ही चांगली बाब नाही. मंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. शिवसेना बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. असे असले तरी कृती समितीच्या माध्यमातून ‘दिबां’साठी लढा कायम राहील. त्यासाठी काहीही करायची भूमिका समितीमधील मंडळींनी घेतली आहे.
ज्यांना अंतकरणाने ‘दिबां’चे नाव विमानतळाला द्यावेसे वाटते ते या लढ्यात सोबत राहतील. एकसंघपणाने आपल्याला काम करायचे आहे. आता स्वस्थ बसायचे नाही, असेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

24 जूनचे आंदोलन दणदणीत झाले पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, ‘दिबा’साहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालाच पाहिजे आणि तो आपला हक्क आहे. त्याकरिता आपला लढा कायम राहील. 24 जून रोजी होणारे आंदोलन दणदणीत झाले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील नाही तर देशातील नागरिकांनी या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. आंदोलनात फूट पाडण्याचे, विरोधाभास निर्माण करण्याचे प्रयत्न होतील, पण कुणालाही घाबरायची गरज नाही. आपला हक्क मिळविण्यासाठी संघर्ष तीव्र करू या.

संपर्क करूनसुद्धा मंत्री एकनाथ शिंदे टाळाटाळ करीत आहेत. ही भूमिका न्यायाची नाही. ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे. त्यासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याची गरज पडली तरी ती वाढवू या.
-जगन्नाथ पाटील, माजी खासदार  

प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे. 3 मेपासून या संदर्भातील बैठका सुरू आहेत. ‘दिबां’चे नाव दिले तर आंदोलन स्थगित केले जाईल, नाही तर 24 जूनला आंदोलन केले जाईल. ‘दिबां’च्या नावाचा आग्रह असल्याचा संदेश या कृती आंदोलनाच्या माध्यमातून राज्य, केंद्र  सरकार प्रशासनपर्यंत पोहचण्यासाठी आंदोलनाची जोरदार तयारी करू या!
-प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

आपण आतंरराष्ट्रीय पोर्ट, महामार्ग रोखू शकतो. त्यामुळे ‘रास्ता रोको’ करायला काही अवघड नाही. मंत्री एकनाथ शिंदे भेटीची वेळ देत नाहीत. त्यामुळे एकदा रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करू. मग मंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर भेटायला येतील. ‘दिबां’च्या नावासाठी मुळमुळीत नाही तर दणदणीत आंदोलन करूया!
-महेश बालदी, आमदार, उरण

दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे ही मागणी रास्त आहे. ‘दिबा’ सर्वांचे नेते आहेत, सर्व समाजासाठी त्यांनी काम केले आहे. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी या आंदोलनात उतरले पाहिजे.
-डॉ. संजीव नाईक, माजी खासदार  

‘दिबां’च्या नावासाठी प्रकल्पग्रस्त, स्थानिक, रायगडपासून मुंबईपर्यंतचे सर्व समाजातील लोकं एकवटली आहेत, मात्र कृती समितीमधील काही मंडळी वरिष्ठांच्या भीतीपोटी दबून बसले आहेत. ते आले तर ठीक नाही तर त्यांच्याशिवाय हा लढा देऊ!
-कॉ. भूषण पाटील  

 • तरुणाईचीही ताकद मिळणार
  प्रत्येक क्षेत्रात तरुणाईची ताकद महत्त्वाची असते. अर्धी लढाई या ताकदीतून यशस्वी होत असते. या बैठकीत लोकप्रतिनिधी, समितीने आपले विचार मांडले. त्या वेळी अनेक तरुणांनी बैठकीत मनोगत व्यक्त करताना ‘दिबां’च्या नावासाठी जिगरबाज तरुणाई या लढ्यात उतरणार असल्याचे जाहीर केले. तरुणांच्या या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले.
 • दिबांच्या नावासाठी लढा आणि शपथ
  24 जूनच्या आंदोलनपूर्वी 10 जूनला कॉम्रेड एल. जी. पाटील यांच्या स्मृतिदिनी ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळेपयर्यंत लढा देण्याची शपथ घेतली जाणार आहे.
 • न्यायिक लढ्यासाठी वकिलांची फौजही
  या वेळी वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ यांनी जवळपास पाच हजार वकिलांची ताकद या लढ्याला मिळेल, असे आश्वासन दिले.
 • जनआंदोलनात रायगड ते मुंबईचा सहभाग
  या बैठकीला रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबईतील विविध संघटनांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या सर्वांनी आपापल्या संघटना 24 जूनच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलनाला रायगड ते मुंबईची जबरदस्त ताकद मिळाली आहे.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply