Breaking News

कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव- मधू मंगेश कर्णिक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

साहित्य समाजमनाचा आरसा आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होते. कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे तर कवी संमेलन हे उत्सवांचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्तर-दक्षिण रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कवितांची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप नेते वाय. टी. देशमुख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, जनसंपर्क प्रमुख, रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख, नाटककार मोहन भोईर, उत्तर रायगड कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे तसेच अ. वि. जंगम, सुनंदा देशमुख, सुधीर शेठ आदी उपस्थित होते.

मधु मंगेश कर्णिक पुढे म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषद जनतेचा प्रवाह आहे. प्रत्येकाला कविता करता येत नाही. मनुष्याचे रडणे-हसणे ही साहित्याची साधने असून बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली जाणार आहे, खर्‍या अर्थाने ही साहित्यिकांची फलश्रुती आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, जनसंपर्क प्रमुख, रायगड भूषण प्रा.एल.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तर रायगड कोमसापचे जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात, उद्याचे अनेक कवी आपल्या सादरीकरणामध्ये, विषयाच्या मांडणीमध्ये, लेखणीमध्ये कुठेही कमी पडू नयेत म्हणून त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी आजच्या कवितेच्या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार उत्तर रायगड जिल्हा कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र घोडके यांनी केले. दुपारच्या खुल्या कवी संमेलनात रायगड जिल्ह्यातील अनेक कवींनी कविता सादर केल्या. या वेळी मधू मंगेश कर्णिक, रामदास फुटाणे व अरुण म्हात्रे, नमिता कीर, प्रा.एल.बी.पाटील हे आवर्जून उपस्थित होते. हे कवी संमेलन अ‍ॅड. चंद्रकांत मढवी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने रायगड कोमसापच्या कवींना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अ‍ॅड. चंद्रकांत मढवी, नारायण सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला. खुल्या कवी संमेलनामध्ये झालेल्या काव्य स्पर्धेेत जुईली आतीतकर हिने प्रथम क्रमांक, अरूण म्हात्रे यांनी द्वितीय क्रमांक, बी. डी. घरत यांना तृतीय क्रमांक तर दीपक सकपाळ आणि रविंद्र सोनावणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. कवि संमेलनाचे सूत्रसंचालन जनार्दन सताणे, जयमाला जांभळे यांनी केले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply