कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यात बुधवारी (दि. 18) सायंकाळी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. त्या वेळी भागूचीवाडी कळंब येथील आदिवासी तरुणाच्या अंगावर वीज कोसळली. त्यात जखमी झालेल्या तरुणावर कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. कळंब ग्रामपंचायत हद्दीमधील भागूचीवाडी येथील शंकर हरी निरगुडा (वय 35) हा शेतकरी बुधवारी संध्याकाळी आपली गुरे चरायला घेऊन गेला होता. त्या वेळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यातील एक वीज शंकर निरगुडा यांच्या अंगावर कोसळली. त्यात शंकरच्या पोटावरील भाग, तसेच डोक्यावरील केस जळून गेले. भागूचीवाडीमधील ग्रामस्थांनी जखमी शंकरला कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. दरम्यान, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, माजी अध्यक्ष जैतु पारधी आणि विभाग अध्यक्ष निरगुडा यांनी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून जखमी शंकर निरगुडा याच्या तब्येतीची चौकशी केली व नैसर्गिक आपत्तीत जखमी शंकर निरगुडा याला मदत मिळावी, यासाठी शासकीय यंत्रणेशी संपर्क साधला.
आम्ही तत्काळ सर्व यंत्रणांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. ते अद्याप का पोहचले नाहीत, याची माहिती घेतली जाईल आणि जखमींची कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा त्यांच्या घरी जाऊन माहिती घेतली जाईल.
-सुधाकर राठोड, निवासी नायब तहसीलदार, कर्जत