Breaking News

कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही!

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांची ग्वाही

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही, अशी ग्वाही माजी खासदार, भाजप नेते व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 28) पनवेल येथे दिली. कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार, ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक ग्राहक भयभीत झाले आहेत. या ठेवीदारांना, ग्राहकांना किरीट सोमय्या यांनी मार्गदर्शन करून दिलासा दिला. कर्नाळा बँकेत घोटाळा नसेल, तर ठेवीदारांचे पैसे ही बँक का देत नाही, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. तुमचे पैसे तुम्हाला मिळवून देण्यासाठी लेखी तक्रार द्या, असे त्यांनी ठेवीदारांना सांगितले. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी आम्ही ठेवीदारांसोबत आहोत, ग्राहकांना त्यांच्या हक्काचे पैसे न देता उलट दमदाटी करणार्‍या व्यवस्थापनाला ताळ्यावर आणण्याचे आपण काम करू, असा विश्वास त्यांनी ठेवीदारांना दिला.

या वेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पीएमसी बँक आणि माझा काहीही संबंध नाही. फक्त अप्रचार करण्याचे काम चालू आहे. या बँकेसंदर्भातही आपण दक्ष असून, आठ लाख ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याचप्रमाणे कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना न्याय मिळवून दिल्यानंतरच आम्ही शांत होणार आहोत, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले. सहकारी बँका चांगल्या प्रकारे चालाव्यात ही आमची मनापासून इच्छा आहे, असे नमूद करतानाच कर्नाळा बँकेत ग्राहकांना स्वतःचे पैसे काढण्यासाठी सारख्या फेर्‍या माराव्या लागत आहेत, चेक बाऊन्स होत आहेत, फिक्स डिपॉझिटचे पैसे मिळत नाहीत, आरटीजीएस होत नाही आणि वर दादागिरीची भाषा; याचाच अर्थ कर्नाळा बँकेत मोठा घोटाळा आहे आणि चिंतेचे वातावरण आहे. अधिक उशीर होण्यापूर्वी ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजे, यासाठी आपण लढा देऊ, असे त्यांनी सांगताच ठेवीदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

कर्नाळा बँकेबाबत आपली भूमिका मांडताना सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही. त्यामुळे आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असतानाही आम्ही निवडणूक जवळ आल्याने त्यावर लगेच कारवाईची मागणी केली नाही, परंतु रोज अनेक ठेवीदार पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे येत असल्याने त्यांना त्यांचे पैसे परत कसे मिळतील याचे मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही अर्थतज्ज्ञ, माजी खासदार किरीट सोमय्या यांना येथे बोलावले.

या वेळी माहिती देताना जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी सांगितले की, गव्हाण ग्रामपंचायतीचे दोन कोटी 23 लाख रुपये कर्नाळा बँकेत आहेत. विकासकामांचे पैसे देण्यासाठी ग्रामपंचायतीने ठेकेदाराला दिलेले कर्नाळा बँकेचे चेक बाऊन्स झाले. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. कोणत्याही परिस्थितीत सामान्य ठेवीदारांच्या कष्टाच्या कमाईचे पैसे सुरक्षित होणे महत्त्वाचे आहे. 

खारघर ओवेपेठ येथील कर्नाळा बँकेचे ग्राहक जितेंद्र जोशी यांनी आपल्या आईच्या नावे पाच लाख रुपयांची एफडी या बँकेत ठेवली होती. वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे काढायला गेल्यावर मला ते मिळाले नाहीत. मग मी संचालकांची भेट घेतली असता, त्यांनी तुम्हाला सगळे पैसे मिळणार नाहीत. गरज असतील तेवढेच पैसे काढा, असे सांगितले. त्यानुसार एक लाख रुपये मागितल्यावर त्यांनी आरटीजीएस करण्यास सांगितले. 13 सप्टेंबर 2019 रोजी आरटीजीएस केले, मात्र अद्याप मला पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे मी वडिलांचे ऑपरेशन करू शकलो नाही, अशी व्यथा जोशी यांनी बोलून दाखविली.

असाच एक अनुभव गणेश वाघिलकर यांनी या वेळी कथन केला. मी या बँकेत खाते उघडले तेव्हा मला मिळालेल्या पासबुकमध्ये मी पैसे न भरताच लाखो रुपयांच्या नोंदी होत्या. याबाबत मी चौकशी केली असता, त्या एका पदाधिकार्‍याच्या पैशाच्या नोंदी असल्याचे समजले. या अर्थव्यवहाराशी संबंध नसल्यामुळे मी ताबडतोब बँकेला कळवून माझे खाते बंद केले, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यापांसून पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली असून, कोणत्याही क्षणी बँक दिवाळखोरीच्या गर्तेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकेच्या या आर्थिक परिस्थितीमुळे खातेदारांमध्ये व ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, गुंतविण्यात आलेले आपले पैसे परत मिळण्यासाठी संबंधित व्यक्ती बँकेच्या शाखांमध्ये गर्दी करीत आहेत. तथापि, बँक व्यवस्थापनाने किमान रक्कम परत करण्यासही असमर्थता व्यक्त केली असल्याने, तसेच ठेवीदारांना दुरुत्तरे केली जात असल्याने व गप्प बसण्यास धमकावले जात असल्याने ठेवीदारांमध्ये बँक व्यवस्थापनाकडून फसवणुकीची भावना व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या मोठ्या रकमेच्या ठेवी कर्नाळा बँकेत असून, त्यांचे बँकेने दिलेले चेक बाउन्स होत असल्याने या ग्रामपंचायतींनाही आर्थिक फसवणुकीस सामोरे जावे लागत आहे. परिणामी ग्रामीण भागात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक व्यवस्थापनाच्या या आर्थिक अपहारामुळे ग्राहकांकडून गुंतविण्यात आलेले पैसे मिळणे त्यांना दुरापास्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना त्यांचे गुंतविण्यात आलेले पैसे बँक व्यवस्थापनाकडून मिळवून देण्यासाठी आज उचलण्यात आलेले पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply