मुरूड : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाची औरंगाबाद-मुरूड गाडी शुक्रवारी (दि. 27) रात्री 11.30 वाजता पेण येथे बंद पडली. या गाडीतील प्रवाशांना मुंबई -मुरूड या निमआराम बसमध्ये बसवण्यात आले, मात्र ती बसही प्रवाशांनी भरलेली असल्याने अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. गिअर पडत नसल्याने औरंगाबाद-मुरूड गाडीचा वेग खूपच मंदावला होता. ती गाडी चढणीवर चढत नसल्याने चालकाने पेण येथे गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. या गाडीतील मुरूडला जाणार्या प्रवाशांना दुसर्या निमआराम बसमध्ये बसवण्यात आले खरे, पण त्यांच्याकडून जादा आकार वसूल करण्यात आला. वास्तविक प्रवाशांना नियोजित जागेवर पोहचवण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. निमआराम बसचे जास्त भाडे घेऊनसुद्धा सर्व प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. याला जबाबदार असणार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या गाडीतून प्रवास करणार्या उदय गद्रे (माजी मुख्याध्यापक, सर एस. ए. हायस्कूल) यांनी केली आहे.