खोपोली : प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) खोपोली नगरपालिका कार्यालयात महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या वेळी प्लास्टिकमुक्तीसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली.
नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळी, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, मुख्याधिकारी गणेश शेटे यांसह सर्व सभापती, नगरसेवक-नगरसेविका, नगरपालिका कर्मचारी, नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. खोपोली हास्य क्लब, लायन्स क्लब, सहज सेवा फाऊंडेशन यांच्यामार्फतही गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता, प्लास्टिकबंदीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. नॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती अभियान अंतर्गत फेरी काढून जनजागृती केली.