Breaking News

जिल्ह्यातील कुपोषण कमी करायचे आहे -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. ते कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. कर्जतप्रमाणेच इतरत्रही कुपोषित बालकांसाठी उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीमधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे सध्या 14 अतितीव्र कुपोषित बालके उपचार घेत आहेत. या बाल उपचार केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच भेट दिली व तेथे दाखल असलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांचे वजन किती वाढले आहे याची माहिती घेतली. त्या कुपोषित बालकांसह राहत असलेल्या पालकांचीही चौकशी केली. त्याच वेळी डॉक्टर किती वाजता येतात, तपासणी करतात का, बालकांना पोषण आहार वेळेवर दिला जातो काय, याचीही माहिती घेतली. तर जिल्ह्यात बाल उपचार केंद्र सुरू करून कुपोषण कसे कमी करता येईल याची माहिती त्यांनी पोषण हक्क गटाचे समन्वयक अशोक जंगले यांच्याकडून समजावून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. दरम्यान, कर्जतप्रमाणेच अन्य ठिकाणीही बाल उपचार केंद्रे सुरू करावीत यासाठी पोषण आहार हक्क गटाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी जंगले यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी बोलवावे लागतात असे स्पष्ट केले. दिशा केंद्राच्या श्वेता सावंत आणि अनिल सोनवणे यांनी जिल्हाधिकार्‍यांना बाल उपचार केंद्राची माहिती दिली. या वेळी प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांच्यासह कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, महिला बालकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी तसेच पर्यवेक्षिकादेखील उपजिल्हा रुग्णालयात हजर होत्या. आदिवासी विकास विभागाच्या पेण कार्यालयाकडून निधी प्राप्त व्हावा यासाठी तत्काळ पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही डॉ. सूर्यवंशी यांनी या वेळी दिल्या.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply