अलिबाग : प्रतिनिधी
कर्नाळा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली असून, बँकेच्या विशेष लेखापरीक्षणासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग 1, सहकारी संस्था, रायगड-अलिबागचे यू. जी. तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेखापरीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने लवकरच कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश होणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत आढळलेल्या कर्नाळा बँकेतील अतिसंशयास्पद अशा 59 कर्ज प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात असून आणखी काही संशयास्पद कर्ज प्रकरणे आहेत का, याची तपासणी सुरू आहे. तपासणी अहवाल 25 ते 30 दिवसांत सादर करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे संबंधित अधिकार्यांनी 24 सप्टेंबर रोजी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांना कळविले आहे.
अशा संशयास्पद कर्जामुळे कर्नाळा बँकेतील ठेवी धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठेवी आता कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न ठेवीदारांना आणि खातेदारांना पडला आहे. दरम्यान, कर्नाळा बँकेची सन 2010मध्येच सविस्तर चौकशी होणे गरजेचे होते, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे अशी चौकशी झाली नाही. परिणामी सामान्य लोकांच्या ठेवी आज असुरक्षित झाल्या आहेत, असे एका निवृत्त अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.