जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/10/Vijay-Suryavanshi.jpg)
अलिबाग : प्रतिनिधी
देशाच्या, राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क तथा कर्तव्य बजावणे अत्यंत आवश्यक आहे, हा संदेश जनमाणसात पोहचविण्यासाठी शनिवारी (दि. 19) जिल्ह्यात वॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रायगडकर व्होट कर, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने आदी उपस्थित होते.डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत स्वीप कार्यक्रमांतर्गत साडेतीन लाख संकल्पपत्र भरून घेण्यात आली आहेत. 271 पथनाट्ये सादर करण्यात आली असून 490 बॅनर्स लावण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, बचतगट, कामगार यांच्यामार्फत 236 मतदार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आल्या. ज्या कंपनीच्या कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मतदानाचे प्रमाण जास्तीत जास्त असेल, त्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अशी स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयांतही घेतली जाणार असून ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मतदानाचे प्रमाण जास्त असेल, त्या महाविद्यालयातील प्राचार्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. बचतगटांच्या ग्रामसेवा संघातही ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सर्व महाविद्यालयातील एनएसएसचे सर्व विद्यार्थी मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी झाले आहेत. अलिबाग येथील शासकीय रुग्णालयातील स्थानिक 42 रुग्णांसाठी विशेष मोहिमेंतर्गत मतदानाची सोय करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम आहे. सेल्फी पॉइंट, सोशल मीडिया आदीमार्फतही मतदार जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 59 हजार लोकांनी अभिरूप मतदान केले. दिव्यांगांसाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात 22 लाख 73 हजार 239 मतदार
रायगड जिल्ह्यात आजअखेर 22 लाख 73 हजार 239 मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 11 लाख 57 हजार 457 पुरुष मतदार, 11 लाख 15 हजार 777 महिला मतदार व इतर पाचचा समावेश आहे. जिल्ह्यात 16 हजार 901 दिव्यांग मतदार आहेत. मतदानासाठी दोन हजार 714 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.