Breaking News

पावसामुळे रस्ता बनला धोकादायक, पोशीर-माले रस्त्यावर चिखल आणि खड्डे

कर्जत : बातमीदार

पुराच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यातील पोशीर-माले रस्त्याचा काही भाग वाहून जाऊन शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हापासून महिनाभर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तात्पुरत्या स्वरूपात मातीचा भराव टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला होता. पावसामुळे पुन्हा हा रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाकडे स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नेरळ-कळंब मुख्य रस्त्यावरील पोशीर-माले येथील रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो. त्यात रस्त्याला केलेला मातीचा भराव बाजूच्या शेतात वाहून जात असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी मोर्‍या न टाकता मागील वर्षी या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम केले, मात्र पुराच्या पाण्यात या रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. त्याअगोदर येथे आरसीसी सिमेंट-काँक्रीटच्या भिंती बांधण्यात आल्या होत्या. त्यादेखील कोसळल्या आहेत. या नादुरुस्त रस्त्यामुळे माले, आसे, फराटपाडा, आर्डे या गावांतील विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात जेथे रस्ता वाहून गेला होता, त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता, मात्र तेथे पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. परिणामी येथून दुचाकी जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, अशी मागणी प्रवासी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुराच्या पाण्याने दरवर्षी हा रस्ता खचतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात रस्ता खचून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मातीचा भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु रस्त्यावर पुन्हा चिखल आणि खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दुचाकी चालवणेही  कठीण झाले आहे. बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवासी व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. -दशरथ वेहेले, माजी सरपंच, साळोख ग्रामपंचायत

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply