नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे फायटर वैमानिक म्हणून पुन्हा रुजू होणे त्यांच्या वैद्यकीय फिटनेसवर अवलंबून आहे, असे हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी सोमवारी सांगितले. विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारीच पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका झाली. भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 फायटर जेट विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन यांचे मिग-21 बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. हवेतल्या या लढाईत त्यांनी पाकिस्तानचे एक एफ-16 विमानही पाडले. अभिनंदन फायटर विमान पुन्हा कधी उडवणार, असा प्रश्न धनोआ यांना विचारला. त्यावर धनोआ यांनी ते विमान उड्डाण करु शकतात की नाही ते त्यांच्या फिटनेसवर अवलंबून आहे, असे सांगितले. त्यांना ज्या उपचारांची त्यांना गरज लागेल ती ट्रीटमेंट आम्ही देत आहोत. ते वैद्यकीयदृष्टया फिट झाल्यानंतर पुन्हा कॉकपीटमध्ये जाऊ शकतात, असे धनोआ म्हणाले. विंग कमांडर अभिनंदन यांना त्याच स्कवाड्रनमध्ये ठेवणार का ? यावर ते त्यांच्या मेडिकल रिकव्हरीवर अवलंबून आहे, असे धनोआ यांनी सांगितले. ते लवकर तंदुरुस्त झाले तर ते त्याच युनिटमध्ये परत जाऊ शकतात. फायटर वैमानिकाच्या फिटनेसबद्दल भारतीय हवाई दल कधीही कुठलाही धोका पत्करत नाही. प्रवेशाच्या पहिल्या पायरीवर वैद्यकीय कारणांमुळे नाकारले जाण्याची शक्यता जास्त असते, असे धनोआ म्हणाले. अभिनंदन वर्थमान यांचे मिग-21 बायसन पाडल्यानंतर ते पॅराशूटच्या सहाय्याने खाली आले. एमआरआय रिपोर्टमध्ये त्यांच्या पाठीच्या कण्याला मार लागल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली येथील एअरफोर्सच्या रुग्णालयात अभिनंदन यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाकिस्तानने त्यांच्या शरीरात कुठलेही उपकरण बसवले नसल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.