Breaking News

सीकेटी कॉलेजमध्ये आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; 422 स्पर्धकांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारी (दि. 17) उत्साहपूर्ण सुरुवात झाली. 22 नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील तब्बल 422 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी संचालक आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई शहर झोन-1 सचिव डॉ. मनोज वर्मा, स्पर्धा सचिव डॉ. व्ही.बी. नाईक, मुंबई उपनगर सचिव डॉ. निलम पाटील आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आयोजनाचे कौतुक करत स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईत खेळ संस्कृती अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले.
सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच मुंबई शहर झोन-1चे उपाध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत उत्कृष्ट खेळभावना जपून खेळण्याचे आवाहन केले.
स्पर्धेत विविध वयोगटातील आणि वजनगटातील सामने सलगपणे होत असून खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. सीकेटी महाविद्यालयात दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये बॉक्सिंग स्पर्धा ही विशेष उत्साहाने होणारी स्पर्धा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही.बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर, प्रा. प्रतिज्ञा पाटील यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply