तौक्ते चक्रीवादळाचा फटका
अलिबाग ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील 661 गावे अजूनही अंधारात आहेत. या वादळाने जिल्ह्यात चार बळी घेतले असून, सहा हजार 36 घरांचे नुकसान झाले आहे.
वादळाचा सर्वाधिक फटका अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या तालुक्यांना बसला. जिल्ह्यात सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील फळ बागायतींचे नुकसान झाले. 150 बोटींचे नुकसान झाले. उच्च दाबाचे 168 व कमी दाबाचे 426 विद्युत खांब पडले. 12 रोहित्र बंद पडले आहेत. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने 1960 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. 1299 गावातील वीजपुरवठा सुरू झाला असून, अजूनही 661 गावांमधील वीजपुरवठा खंडित आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना दिले आहेत. घर, गोठे, शेती व सार्वजनिक मालमत्ता, तसेच मृत व्यक्ती व जनावरे यांच्याबाबतही संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरीत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.