खारघर : रामप्रहर वृत्त
येथील अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याबाबत भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी (दि. 31) सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये झालेल्या बैठकीत चर्चिलेल्या मुद्द्यांवरील कार्यवाही कुठपर्यंत झाली आहे, याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याबाबत अन्य माहिती मागितली आहे. खारघरला सध्या किती एमएलडी पाणी आवश्यक आहे व सद्यस्थितीत किती पाणी मिळते. पाणीपुरवठा योग्य प्रमाणात नसेल, तर त्यासाठी आपण कोणत्या तातडीच्या, अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना केल्या आहेत. 2015 पासून खारघरला आवश्यकतेपेक्षा नऊ एमएलडी पाणी कमी पुरवले जाते, तसेच आज 2019 मध्ये शहराची लोकसंख्या 25-30 टक्के वाढली आहे, त्याबाबत पाणीपुरवठ्यासाठी काय उपाययोजना केली आहे. हमरापूर ते जिते ही 1200 मिमीची जलवाहिनी 1500 जिमी करण्याचे काम किती दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. याबाबतची माहिती ब्रिजेश पटेल यांनी पत्राद्वारे मागितली आहे. खारघरमधील पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने जनतेला योग्य व खरी परिस्थिती सांगणे आवश्यक आहे, असेही शेवटी निवेदनात पटेल यांनी म्हटले आहे.