नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा
सिडको भवनमध्ये नागरिकांना प्रवेशासाठी आता प्रत्येक मजल्यानुसार विशिष्ट रंगाच्या पासवरच प्रवेश मिळणार आहे. नागरिकांना ज्या मजल्यावर काम आहे त्या मजल्याच्या विशिष्ट रंगाचा पास सुरक्षा विभागाकडून दिला जाणार आहेत. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली यांच्या निर्देशानुसार सोमवारी (दि.16) 2019 निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांना प्रथम मजल्यासाठी पिवळा, दुसर्या मजल्यासाठी लाल, तिसर्या मजल्यासाठी निळा, चौथ्या मजल्यासाठी व्हॉयलेट, पाचव्या मजल्यासाठी पांढरा, सहाव्या मजल्यासाठी गर्द निळा व सातव्या मजल्यासाठी हिरवा या रंगाचे पास जारी केले जाणार आहेत. नागरिकांनी ज्या रंगाचा पास घेतला आहे केवळ त्याच मजल्यावर नागरिकांना जाण्याची मुभा असणार आहे. उदाहरणार्थ पाचव्या मजल्यासाठी पांढरा पास घेतलेली व्यक्ती केवळ पाचव्याच मजल्यावर जाऊ शकेल व इतर कोणत्याही मजल्यावर जाऊ शकणार नाही. इतर मजल्यावर जाण्यासाठी त्या व्यक्तीला आधीच्या पासवर विभागप्रमुखाची सही घेऊन तो पास जमा
करून पुढील इच्छित मजल्याच्या रंगाचा स्वतंत्र पास जारी करून घ्यावा लागणार आहे.
– नागरिकांची कामे जलद होण्यास मदत
अनेक नागरिकांना त्यांचा इच्छित विभाग व संबंधित अधिकारी कोणत्या मजल्यावर आहेत त्याची माहिती नसल्याने त्यांना फिरत बसावे लागते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सिडकोने हे पाऊल उचलले आहे. नागरिकांचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही. यातून सिडकोच्या कामकाजात सुसुत्रता येऊन नागरिकांची कामे देखील त्यातून सुलभतेने पार पडण्यास निश्चितच मदत होईल.