Breaking News

मराठी चित्रपट महोत्सव निमित्ताने पडद्यावरचा महाराष्ट्र

विविध प्रकारचे चित्रपट महोत्सव ही चित्रपट संस्कृतीतील एक महत्त्वाची गोष्ट आणि त्यानिमित्त चित्रपट संस्कृतीतील काही गोष्टींवर फोकस टाकण्याची संधीही मिळते. चित्रपट व मालिका यातून होत असलेले महाराष्ट्रातील विविध शहरांपासून ते ग्रामीण भागातील दर्शन हादेखील एक महत्त्वाचा विषय.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 24 एप्रिलदरम्यान पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे चित्रपताका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ’मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच ‘चित्रपताका’ ही संकल्पना या महोत्सवामागे आहे. या चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण 41 दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये पूर्ण लांबीचे सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरण विषयक, स्त्री जीवना विषयक प्रश्न मांडणारे चित्रपट, बालचित्रपट, विनोदी अशा विविध जॉनरच्या चित्रपटांचा समावेश आहे. मराठी चित्रपटांविषयीचे प्रदर्शनही या महोत्सवात आहे.
थर्ड आय चित्रपट महोत्सव, मुंबईत आयोजित करण्यात आलेला मराठी चित्रपट महोत्सव यातील श्रीकांत प्रभाकर दिग्दर्शित व श्री बैजप्रभा चित्र निर्मित भेरा या चित्रपटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील छोट्या गावात झाले आहे. जून 2020मध्ये कोरोना काळातील ही भावस्पर्शी नि अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. याचे संपूर्ण चित्रीकरण कुडाळ, निवती समुद्र किनारा इत्यादी ठिकाणी झाले आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट हे ग्रामीण वातावरण कथेचा महत्त्वाचा भाग झाले आहे, तर कुडाळ आणि कोकणातील अन्य काही ठिकाणी स्टार प्रवाहवरील कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे कथानक घडते. या मालिकेत गिरीजा प्रभू, सुकन्या कुलकर्णी मोने, वैभव मांगले, अमित खेडेकर, अमृता माळवदकर, भाग्यश्री पवार, मंदार जाधव इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेची पहिली झलक कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात दशावतारचा प्रयोग आयोजित करण्यात आला असता त्यात दाखवण्यात आली आणि स्थानिक नागरिकांचा त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. स्थानिक संस्कृतीचा असा सहभाग विशेष उल्लेखनीय गोष्ट. कुडाळ रेल्वेस्थानकावर उतरताच या मालिकेच्या टीमचे अतिशय झालेले उत्फूर्त स्वागत उत्साहवर्धक. हे असे प्रेम आऊटडोअर्स लोकेशन शूटिंगच्या वेळेस मिळते.
चित्रपट व मालिकेतील महाराष्ट्र याच्या फ्लॅशबॅकमध्ये जायचे तर, आपल्याकडे ’सिनेमाचा जन्म’च आपल्या मुंबईत झाला आणि तोदेखिल दादासाहेब फाळके या मराठी माणसामुळे झाला. त्यांनी दादरच्या पूर्वेला मथुरा भवन नावाची इमारत होती, तेथे एक स्टुडिओ उभारुन ’राजा हरिश्चंद्र’ (3 मे 1913 रोजी प्रदर्शित) या आपल्याकडच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. (आज जो दादासाहेब फाळके रोड आहे, तेथेच ही इमारत होती) .
सिनेमा निर्मितीची मुहूर्तमेढच मुंबईत झाल्याने सुरुवातीला येथेच चित्रपट निर्मिती होत राहणे स्वाभाविक होते तसेच दादासाहेब फाळके यांची फाळके अ‍ॅन्ड कंपनी ही चित्रपट निर्मिती संस्था नाशिक येथे असल्याने तेथेही काही प्रमाणात चित्रपट निर्मिती झाली. बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीने कोल्हापूर येथे चित्रपट निर्मिती सुरू केली. दिग्दर्शक विष्णूपंत दिवेकर यांनी भारत फिल्म कंपनीच्या वतीने ’कृष्णकुमार’ या पौराणिक चित्रपटाची पुणे शहरात निर्मिती केली आणि मग तेथेही चित्रपट निर्मितीची संख्या हळूहळू वाढली. मुंबई, पुणे आणि नाशिक ही मूकपटाच्या काळातील चित्रपट निर्मितीची मुख्य केंद्र होती. तेथे आणखी काही निर्माते आणि दिग्दर्शक कार्यरत होत राहिले. 1931 साली दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांनी मुंबईत ’आलम आरा’ हा पहिला हिंदी बोलपट निर्माण केला, तर 1932 साली प्रभात फिल्म कंपनीसाठी चित्रपती व्ही. शांताराम यांनी ’अयोध्येचा राजा’ हा मराठीतील पहिला बोलपट कोल्हापूर येथे निर्माण केला.
त्या काळात, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्तानात मुंबई, पुणे, कोल्हापूर, चेन्नई (पूर्वीचे मद्रास), कोलकत्ता (पूर्वीचे कलकत्ता) आणि लाहोर (आता पाकिस्तानमध्ये) ही चित्रपट निर्मितीची मोठी केंद्र होती.
साठच्या दशकात ’सिनेमा बाह्यचित्रीकरण स्थळावर’ आला. ते गरजेचेही होते. सुरुवातीला मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी, वरळी सी फेस, जुहू चौपाटी येथे एखादे गाणे चित्रीत होऊ लागले. मग महाबळेश्वर, पांचगणीला पसंती मिळाली. दुलाल गुहा दिग्दर्शित ’दुश्मन’ (1972)चे बरेचसे चित्रीकरण नाशिक येथे झाले.
मराठी व हिंदी चित्रपटाने महाराष्ट्रातील अधिकाधिक लहान मोठ्या पर्यटन स्थळांवर, शहरात, गावाखेड्यात शूटिंग सुरु केले आणि त्यात या एकूणच कालावधीत बदलत गेलेला महाराष्ट्र ’सिनेमाच्या पडद्यावर’ येत गेला. त्याचा वेग पंचवीस तीस वर्षात खूपच वाढलाय. मुंबईजवळच्या मीरा भाईंदर, वसई, नायगाव असे करता करता एकीकडे सफाळा तर दुसरीकडे घोडबंदर रोडवर लहान मोठे कारखाने बंद पडले. त्याचे रूपांतर शूटिंग स्पॉटमध्ये झाले तसेच अनेक फार्म हाऊस, रिसोर्टसमध्येही चित्रपट, मालिकांचे शूटिंग होऊ लागले, तर मराठी चित्रपटाने सत्तरच्या दशकात अलिबाग तालुक्यातील चौल परिसरात ’यशोदा’चे शूटिंग केले, काही वर्षांनी सासवणे समुद्र किनारावर ’मुंबईचा फौजदार’मधील रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्यावर हा सागरी किनारा… या गाण्याचे शूटिंग केले. कालांतराने ’क्षणभर विश्रांती’ हा संपूर्ण मराठी चित्रपटच अलिबागमध्ये घडताना, तर रेवदंडापर्यंत शूटिंग केले. अगदी माधुरी दीक्षितने भूमिका साकारलेल्या एकमेव मराठी चित्रपटाचे रेवदंडा परिसरात शूटिंग झाले आणि तिच्यासोबत भूमिका साकारत असलेल्या रेशम टिपणीसने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया असा ये जा प्रवास केला. मराठी व हिंदी चित्रपटासह मालिका, एखादी जाहिरात, म्युझिक अल्बम यांचेही अलिबागच्या गावागावात सातत्याने शूटिंग असते. चौलमधील रामेश्वर मंदिर आणि त्याची पोखरण यांचा काही दिग्दर्शक अतिशय उत्तम रितीने उपयोग करुन घेतात. प्रकाश कुंटे दिग्दर्शित ’कलरफुल’ या मराठी चित्रपटासाठी सई ताह्मणकर आणि ललित प्रभाकर यांच्यावर येथेच महत्त्वाची दृश्ये चित्रीत केली. अनेक दिग्दर्शक, छायाचित्रणकार, कला दिग्दर्शक यांनी महाराष्ट्रातील अधिकाधिक स्थानांचा असाच थीममध्ये अथवा एकाद्या दृश्यात वापर करून ’जुना आणि बदलता महाराष्ट्र’ सिनेमाच्या पडद्यावर आणायला हवा. नुसतेच आपलं, युनिट घेऊन एखाद्या गावाला जायचे आणि तेथील शांतता भंग करायची असे नको. महत्त्वाचे म्हणजे, त्या गावातील स्थानिकानाही युनिटमध्ये शक्य तेथे सामावून घेऊन त्याना रोजगार मिळू देत.
राज्यात विविध ठिकाणी शूटिंगच्या प्रवासात बरेच संदर्भ आहेत. दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी ’युगंधर’चे बरेचसे शूटिंग मुरूडला केले. दिग्दर्शक राजेश म्हापुस्करने आपण श्रीवर्धनचे आहोत म्हणून आपल्या ’व्हेटिंलेटर’ चित्रपटाचा मुहूर्त आणि सुरुवातीचे प्रसंग तेथेच चित्रीत केले. रोहन मापुस्करचा एप्रिल मे 99 याच श्रीवर्धनमध्ये घडतो. पंचवीस वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील मामाच्या घरच्या आठवणी ताज्या करतो. अगदी जवळचा विषय.
कोकणात खेड चिपळूणपासून मालवण, सिंधुदुर्गपर्यंत पूर्वीच्या तुलनेत आता शूटिंगचे प्रमाण खूपच वाढलेय. मच्छिंद्र कांबळीच्या विनय आपटे दिग्दर्शित ’करायचं ते दणक्यात’चे बरेचसे शूटिंग मालवणला केले. 1999चा हा चित्रपट. संदीप सावंत दिग्दर्शित ’श्वास’नंतर (2003) कोकणात ’शूटिंग करूयात’ ही भावना वाढली. ’रात्रीस खेळ चाले’ ही अख्खी मालिका कोकणात घडली आणि त्याची बरीच चर्चाही झाली. आशुतोष गोवारीकरने ’खेले हम जी जानसे’चे थीमनुसार रत्नागिरीत शूटिंग केले तेव्हा अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण हे विमानाने पणजीला जात आणि तेथून रत्नागिरी गाठत. ’काकस्पर्श’चे गुहागरला शूटिंग होताना तो सगळा परिसर पटकथेचाच एक भाग बनले. विहीरीवरील रहाटावरचा प्रिया बापटने साकारलेला प्रसंग अतिशय उत्तम आहेच, त्यात आजूबाजूच्या परिसराचाही प्रभाव दिसतो.
खोपोली (येथील स्नेहबंध वृध्दाश्रमात ’तिन्ही सांजा ’चे शूटिंग झाले), खंडाळा, लोणावळा परिसरातील शूटिंगचे संदर्भ सांगावे तेवढे थोडेच. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शूटिंगचे योग. 8 दोन 75चे कात्रजमध्ये तर ’शपथ’चे फार पूर्वी बारामतीत शूटिंग झाले. सिंहगडवर ’लपंडाव’चे शूटिंग झाले तसेच ’बघतोस काय मुजरा कर’मध्ये गड किल्ल्याचे अभिमान वाटावा असे दर्शन झाले. जुन्नर परिसरात संतोष मांजरेकर दिग्दर्शित ’लकडाऊन’चे शूटिंग झाले. खडकवासला येथील दादा कोंडके स्टुडिओचे नव्वदच्या दशकात शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते उदघाटन झाले आणि तेथेही शूटिंगचे सातत्य आहे. भोर तालुक्यात शूटिंगला भरपूर स्कोप. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरपासून आतल्या भागात भोरचा ग्रामीण भाग सुरु होतो. भोरचा भव्य राजवाडा (बाजीराव मस्तानी, कट्यार काळजात घुसली, मुंबई पुणे मुंबई 2, हे चित्रपट तसेच अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इत्यादी ऐतिहासिक मालिकांचे शूटिंग येथलेच), नदीकाठी वसलेल्या बनेश्वरमधील महादेवाचे मंदिर, नीरा देवधर, भाटघरची धरणं, येळवती आणि नीरा नदीमुळे इंगवली गावालगतचा परिसर, इंगवली गावाचे प्रवेशद्वार असे करता करता तेथील स्टुडिओपर्यंत शूटिंग होत असते. ’माहेरची साडी’चे सगळे शूटिंग याच स्टुडिओत झाले. साईबाबा या हिंदी मालिकेचे तेथे दीर्घकाळ शूटिंग आहे. भोर तालुक्यात ’हिरकणी’, ’चंद्रमुखी’ अशा बहुचर्चित चित्रपटांचे शूटिंग झाले. सातारामध्येही सातारा शहर तसेच भोगाव, शेंदूर जणे, आनंदपूर, म्हसवड, कदमवाडा, सायगाव, उंब्रज इत्यादी ठिकाणी शूटिंग सुरु असते. सातारातच अलका आठल्येच्या ’आई माझी काळूबाई’ या मालिकेचे शूटिंग झाले. सातारा शहरातील शुभम आणि राजलक्ष्मी थिएटरमध्ये ’चल लवकर’ या चित्रपटाचे शूटिंग झाले. वाई आपण अनेक चित्रपटात पाहातो. तेथील परखंदी गाव अनेक चित्रपटात दिसले. आशुतोष गोवारीकरने ’स्वदेस’मध्ये हा सगळा परिसर एखाद्या व्यक्तिरेखेप्रमाणे दाखवला. प्रकाश झा तर आपल्या अनेक चित्रपटातील बिहार अथवा उत्तर प्रदेश म्हणून याच परिसरात शूटिंग करतात आणि आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टीगसाठी आमंत्रित करतात. पाचगणी, महाबळेश्वर परिसरात शूटिंग होणे स्वाभाविक आहेच. कोल्हापूरला शूटिंगचे अनेक स्पॉट आहेत. कोल्हापूर चित्रनगरीत महेश कोठारे निर्मित ’दख्खनचा राजा ज्योतीबा’ या मालिकेचे शूटिंग झाले. रंकाळा, पन्हाळा, किशा बापूचा मळा येथे बरेच शूटिंग झाले आहे. कराडच्या कडेपूर परिसरात अलका आठल्येने ’अग्निपरीक्षा’ या चित्रपटाचे शूटिंग केले. सांगलीतील नरसोबाची वाडी शूटिंग स्पॉट आहे.
उत्तर महाराष्ट्रातही शूटिंगचे सातत्य आहेच. एन. चंद्रा ’प्रतिघात’, ’नरसिंह’चे आवर्जून नाशिकमध्ये भरपूर शूटिंग केले तेव्हा त्यांचे म्हणणे होते, नाशिक म्हणजे आपल्या देशातील कोणत्याही शहराचे मिनीऐचर अर्थात छोटी आवृत्ती आहे. नाशिक परिसरात ’सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने ठाणच मारली. ’गोदावरी’ या मराठी चित्रपटात हा परिसर पटकथेचाच एक भाग असल्याने तेथे शूटिंग झाले. माधुरी दीक्षितने ’अ‍ॅक्ट्रेस’ या वेबसिरिजसाठी नाशिकमध्ये शूटिंग केल्याची स्थानिक वृत्तपत्रात पहिल्या पानावरची बातमी झाली. तात्पर्य, अमूकतमूक गावात शूटिंग झाले हो एवढ्यापुरती ही संस्कृती नाही. जळगावला ’काळशेकर आहेत का?’च्या शूटिंगसाठी भरत जाधव व दीपाली सय्यदने बरेच दिवस मुक्काम केला. शिर्डीत साईबाबांवरचे चित्रपट, मालिका, गाणी यांचे शूटिंग होणे स्वाभाविक आहे. नगर शहर आणि तालुक्यात आता बरेच शूटिंग झालेय. गजेंद्र अहिरेने ’विद्यापीठ’चे सगळे शूटिंग नगरमध्ये केले. तुझं माझं जमेना या मालिकेची सगळी वाटचाल नगरमध्ये आहे. अर्थात, बाह्यचित्रीकरण स्थळी शूटिंगला गेल्यावर पुन्हा बंगल्यातच गोष्ट घडणे उपयोगाचे नाही, तर तो परिसरही यायला हवा. सौभाग्यावती भव या चित्रपटाचे अमरावती, अकोला, परतूर, रेणुकामाता देवस्थान अशा अनेक ठिकाणी शूटिंग झाले. मन मंदिरा, गजर कीर्तनाचा या मालिकेचे राज्यातील अनेक देवस्थळांवर शूटिंग झाले. मिलिंद गुणाजीनेही ’भटकंती’ या कार्यक्रमातून राज्यातील अनेक गडकिल्ले, पर्यटन स्थळाची अतिशय उपयुक्त अशी माहिती करून दिली. नागपूरमध्ये फॅमिली नंबर वन या मराठी चित्रपटाचे शूटिंग झाले.
राज्यात अशा पद्धतीने अनेक ठिकाणी शूटिंगचे योग आले अथवा येताहेत. आणखी काही नावे सांगायची तर, धामनेर, सज्जनगड, कास माऊली, निढळ, चाफळ, अंबेजोगाई, फलटणचा निंबाळकर वाडा, तसेच एकीकडे मलकापूर, तर दुसरीकडे खारेपाटण, मावस, मावळंगे, गोठणे, मसूरे अशी बरीच नावे सांगता येतील.
अशा पद्धतीने दूरदूरवर शूटिंगचे प्रमाण वाढण्याच्या कारणात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तम वाहतूक व्यवस्था आणि मोबाईल कनेक्टीव्ही हेदेखील आहे. त्याच वेळेस राज्यातील विविध भागातून लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार मनोरंजन क्षेत्रात आले. ते होणे गरजेचे असते. तरच त्या क्षेत्रात नवीन कल्पना येत राहतात. वैभव तत्ववादी नागपूरवरून आला तर सई ताह्मणकर सांगलीवरून आली. रसिका सुनील मुळची अकोल्याची, मकरंद अनासपुरे औरंगाबादचा तर भारत गणेशपुरे अमरावतीचा. अलका दाते नाशिकची तर वैभव मांगले कोकणातून आला. अशी बरीच उदाहरणे आहेत. अर्थात, आपली गुणवत्ता आणि स्वप्ने घेत असे अनेकजण मुंबईत येतात, एकीकडे राहण्याची समस्या असते तर दुसरीकडे एकेका संधीसाठीचा संघर्ष असतो आणि ज्याचा त्यालाच करायचा असतो. याचीच दुसरी बाजू अशी राज्यातील विविध भागातून येतांना हे आपल्या स्थानिक भाषेची द्धत अथवा शैली घेऊन येतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मकरंद अनासपुरे असो अथवा भारत गणेशपुरे असो त्यांच्या मूळ भाषेसह यशस्वी झाले. अर्थात, आपल्या मेहनतीने त्यांनी आपले स्थान निर्माण केले.
अशा पद्धतीने मनोरंजन क्षेत्रात चहुबाजूने महाराष्ट्रातील स्थळे, माणसे, भाषा आणि सर्व प्रकारची संस्कृती यांची छान सरमिसळ झाली आहे. एकाद्या दिवशी चित्रपट अथवा मालिकेच्या सेटवर कोणी वैदर्भीय सावजी मटणाचा डबा आणतो तर कोणी नागपूरची संत्रा बर्फी, कोणी नाशिकचा चिवडा, अलिबागचा पांढरा कांदा आणतो मग इतरांनाही त्याची चव चाखता येते.
रूपेरी पडद्यावरचा महाराष्ट्राचा एकूणच प्रवास खूपच मोठा विषय आहे. मोठ्या पडद्यावरुन तो छोट्या पडद्यावर असा दोन्हीकडे सुरू आहे. लेखात दिलेली उदाहरणे हा फक्त ट्रेलर आहे. यासह अनेक चित्रपट, मालिका, जाहिराती वगैरेंचे राज्यातील विविध ठिकाणी शूटिंग होत होत हा माहितीपूर्ण व रंजक प्रवास सुरु आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या चित्रपताका महोत्सवाच्या निमित्ताने हा एक वेगळा आणि चित्रपटसृष्टी व सामान्य नागरिक यांच्या अगदी जवळच्या गोष्टीवरील फोकस. आपल्याकडील चित्रपट आपल्या प्रेक्षकांना जास्त जवळचा व आपलासा म्हणून ही वेगळी दखल.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply