खोपोली : प्रतिनिधी
तालुक्याचा कारभाराची जबाबदारी असलेल्या खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन दोन वर्षापासून बंद असून, वर्षभरापूर्वी मागणी करूनही त्यांना अद्याप नवीन वाहन मिळालेले नाही. खालापूर तालुका वेगाने विकसित होत आहे. मोठे गृहप्रकल्प, कारखानदारीचा पसारा वाढत आहे. 2011च्या जणगणनेनुसार खालापूरची लोकसंख्या 2,07464 होती. त्यात आता प्रचंङ वाढ झाली असून तालुका विस्तारत आहे. तालुक्याचे पालकत्व म्हणून जबाबदारी असलेल्या तहसीलदारांना आपत्कालीन प्रसंग, शासकीय कामे यासाठी तालुका पालथा घालताना वेळेचे बंधन नसते. वाळू चोरी, कारखान्यातील वाद याशिवाय नैसर्गिक आपत्तीत तहसीलदारांना भेट द्यावी लागते. तहसीलदारांसाठी शासनाकङून वाहनाची सोय असते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून खालापूर तहसीलसाठी असलेले वाहन नादुरूस्तीमुळे एकाच जागी उभे आहे. या चारचाकी वाहनाची भंगार अवस्था झाली आहे. तत्कालीन तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी नवीन वाहनाची मागणी केल्याचे वर्षभरापूर्वी सांगितले होते. परंतु चव्हाण यांची बदली होऊन एक वर्ष उलटले तरीही खालापूर तहसीलसाठी नवीन वाहन मिळालेले नाही.
वनविभागाकरिता नवीन वाहने पुरविण्यात आली आहेत. निवडणूकिची कामे, शेतीची नुकसान पाहणी यासाठी तहसीलदारांना वारंवार दौरे करावे लागत असून, खालापूर तहसिलदारांना नवीन वाहन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
-उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते, खालापूर