नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
तीन पदकांचा मानकरी ठरलेल्या साजन भानवाल (77 किलो) याला ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी भारताच्या रवीने (97 किलो) रिपिचेज फेरीत स्थान मिळवले आहे.
तुर्कीच्या सेरकान अयोकुन याच्यासमोर भानवालचा निभाव लागला नाही. त्यामुळे कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भानवालला 1-10 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
रवीने उपउपांत्यपूर्व फेरीत जॉर्जियाचा कुस्तीपटू जिऑर्जी मेलिया याला 8-0 असे पराभूत केले. आता रिपिचेज फेरीद्वारे कांस्यपदकापर्यंत मजल मारण्यासाठी रवीला एका विजयाची आवश्यकता आहे.
भारताच्या अर्जुन हालाकुरकी याला 55 किलो वजनी गटाच्या रिपिचेज फेरीत अर्मेनियाच्या नोरायर हाखोयान याच्याकडून 2-10 असे पराभूत व्हावे लागले. 87 किलो गटात सुनील कुमारने रिपिचेज फेरीतील पहिल्या सामन्यात स्वीडनच्या अलेक्झांडर स्टेपानेटिक याला 5-3 असे पराभूत करत कांस्यपदकाच्या आशा कायम राखल्या, मात्र त्याला दुसर्या सामन्यात क्रोएशियाच्या इव्हान हुकलेक याने 6-3 असे पराभूत केले.
60 किलो गटात सचिन राणा याला पहिल्याच फेरीत चीनच्या लिगोऊ काओ याच्याकडून 2-5 असा पराभव पत्करावा लागला. 72 किलो वजनी गटात राहुल याला रशियाच्या मगोमेद यारबिलोव्हने 0-8 अशी धूळ चारली. नीरजला 82 किलो गटात सर्बियाच्या ब्रांको कोवासेव्हिकने 1-10 असे हरवले.