Breaking News

केपीएलमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग

क्रिकेटपटूला अटक

बंगळुरू : वृत्तसंस्था

मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये समोर आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)मध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याआधी केपीएलशी जोडल्या गेलेल्या एका टीमच्या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. केपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून निशांतला अटक केली आहे, असे बंगळुरूचे संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) ए. पाटील यांनी सांगितले.

निशांत सिंह शेखावत सट्टेबाजांच्या संपर्कात होता. खेळाडूंनी मॅच फिक्स करावी यासाठी त्याने बंगळुरू ब्लास्टर्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसादशीही संपर्क केला होता. विशेष म्हणजे प्रसादला याआधीच फिक्सिंगप्रकरणी अटक झाली आहे.

बंगळुरू ब्लास्टर्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसाद आणि फलंदाजी प्रशिक्षक विश्वनाथन यांना मागच्या आठवड्यात मॅच फिक्सिंगच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक झाली. मागच्या वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या सामन्यात फिक्सिंग केल्याचा आरोप प्रशिक्षकांवर आहे.

दुसरीकडे मागच्याच महिन्यात केपीएलची टीम बेळगावी पँथर्सचा मालक अशफाक अली थारा यालाही सट्टेबाजीमध्ये सामील झाल्याच्या आरोपात बंगळुरूमधूनच अटक करण्यात आली. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने 16 ते 31 ऑगस्टदरम्यान केपीएलचे आयोजन केले होते.

पर्यटन व्यवसाय असलेल्या अशफाकने 2017 साली बेळगावी पँथर्स टीम विकत घेतली होती. केंद्रीय गुन्हे शाखेने अनेक दिवस चौकशी केल्यानंतर अशफाकला अटक केली. अशफाकशिवाय केपीएलशी जोडल्या गेलेल्या इतर टीमच्या खेळाडूंचीही चौकशी करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply