अलिबाग : जिमाका
बालकामगार प्रथेविरुद्ध संपूर्ण राज्यात जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्याबाबत कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकार यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास कामगार उपायुक्त प्र. न. पवार, सहाय्यक कामगार आयुक्त भ. मा. आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी व्हनाळकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी, जिल्हा कृती दलाचे सदस्य, हॉटेल, व्यापारी असोशिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात महिनाभर बालकामगार प्रथेविरुद्ध विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यत्वे पोस्टर्स, होर्डिंग, रॅली, पथनाट्ये, विट भट्टी मालकांकडून हमीपत्र भरुन घेणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात कृतीदल सदस्य श्रीमती काळे यांनी सांगितले की, या अभियानांतर्गत सर्व घटकांनी आपला सहभाग नोंदवून या अनिष्ठप्रथेचे समूळ उच्चाटन करावे व बालकामगारांचे बालपण हरवता कामा नये याकरीता सर्व उद्योग व्यावसायिक यांनी कोणत्याही परिस्थितीत बालकामगार कामावर ठेवू नये.