कर्जत : बातमीदार
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक तसेच दिशाभूल होते अशा तक्रारी होत्या. त्या अनुशंघाने येथील पोलिसांनी दोन दिवस मोहीम राबवून दस्तुरी येथील घोडेवाले, हात रीक्षावाले, एजंट व कुली यांच्यावर कारवाई केली.
सध्या माथेरानमध्ये दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, मिनिट्रेन बंद असल्याचा फायदा उचलत दस्तुरी येथील घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व कुली हे आलेल्या पर्यटकांची फसवणूक करत होते. त्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दस्तुरी येथे जाऊन त्याची खातरजमा केली. व दस्तूरी येथील फसवणूक थांबवण्यासाठी कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र राठोड, पोलीस शिपाई राहुल मुंढे, राहुल पाटील, प्रशांत गायकवाड, होमगार्ड हरीश तिटकारे, यशवंत थोराड, सचिन पारधी यांच्या पथकाने मंगळवार व बुधवारी धडक करवाई सुरू केल्याने दस्तुरी येथील घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व कुली यांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी (दि. 5) मंकी पॉईंट येथील घोडेवाल्यांच्या नमदा क्रमांकांची पोलिसांनी तपासणी केली, त्यामध्ये दोन घोड्यांना नमदा क्रमांक नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार घोडा परवाना क्रमांक 328 व 452 क्रमांकाच्या घोडे मालकांवर कारवाई करण्यात आली. एका घोडे मालकाने पर्यटकांकडून चार घोड्यांचे भाडे तब्बल आठ हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या पर्यटकाला पोलीस ठाण्यात नेऊन एक घोड्याचे अकराशे प्रमाणे भाडे घेऊन बाकीचे पैसे परत करण्यात आले. जे घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व कुली दस्तुरी येथे आलेल्या खाजगी वाहनांच्या मागे धावतात, त्यांना बुधवारी (दि. 6)पोलिसांनी पार्किंगमध्ये येण्यास मज्जाव केला व पार्किंगच्या बाहेर पर्यटकांना सेवा द्यावी असे सांगितले. तरीही अरेरावी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम यांनी पोलिसांच्या या कारवाईस दुजोरा दिला, तर माथेरानकरांनी या कारवाईचे
स्वागत केले आहे.
मंकी पॉईंट येथील एका घोडे मालकाने प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे पर्यटकाकडून घोड्याचे भाडे घेतले, हे पाहून मी स्वतः हैराण आहे. हा घोडेवाला मूळवासीय अश्वपाल संघटनेचा असून पदाधिकार्यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे व पर्यटकांची जर अशी फसवणूक होत असेल, तर पोलिसांनी अवश्य करवाई करावी.
-आशाताई कदम, अध्यक्ष,
स्थानिक अश्वपाल संघटना, माथेरान
दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक होते, अशा तक्रारी वारंवार होत होत्या. यावर पोलिसांनी केलेली कारवाई ही स्वागतार्ह आहे. -राजेश चौधरी, अध्यक्ष,
व्यापारी फेडरेशन माथेरान