Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

राज्यपालांच्या निर्देशानुसार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 8) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यपालांच्या सांगण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

फोडाफोडीचे पुरावे द्या; अन्यथा माफी मागा!

काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी वक्तव्य करीत आहेत. भाजप आमदार फोडण्याचे काम करीत आहेत, असाही आरोप केला जातो आहे. त्यांना माझे खुले आव्हान आहे की, तुम्ही पुरावे द्या; नाही तर माफी मागा. सरकार स्थापन करताना आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, हे आश्वासन देतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही तोडणारी नाही, तर जोडणार लोकं

गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केले, पण त्यांनी ते उचलले नाही. चर्चेची दारे आमच्याकडून खुली होती. भाजपसोबत चर्चाच करायची नाही हे धोरण शिवसेनेचे आहे, आमचे नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शिवसेनेकडून दररोज बोलणार्‍या काही नेत्यांनी दरी वाढवण्याचे काम केले. बोलण्यामुळे त्यांना मीडिया स्पेस नक्की मिळते, पण अशा बोलण्याने सरकार बनत नाही. तुम्ही ज्या भाषेत बोलता त्या भाषेत आम्हाला उत्तर देता येत नाही असे समजू नका. आम्हीसुद्धा तुमच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो, पण आम्हाला अशा पद्धतीचे बोलणे शोभत नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. आम्ही तोडणारी नाही जोडणार लोकं आहोत. आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. आम्ही उद्धवजींबद्दल एकही वक्तव्य केले नाही, मात्र गेल्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ज्या खालच्या दर्जाची टीका झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कधीही निर्णय झाला नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती. त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल, तर मला माहीत नव्हते. मी याबाबत अमित शहा आणि नितीन गडकरी यांना विचारले, पण त्यांनीही असे काही ठरलेले नसल्याचे सांगितले. या संदर्भातील समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. शिवसेनेने आमच्याशी चर्चाच केली नाही. मित्रपक्षाशी चर्चा करण्याऐवजी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेनेने चर्चा केली, मात्र आमच्यासोबत चर्चा करण्यात त्यांना रस नव्हता. काही मुद्दे असतील, तर ते चर्चेने सुटले असते, पण शिवसेनेने चर्चा करण्याची तयारी दाखवली नाही.

उद्धव ठाकरेंचे ‘ते’ पहिलेच वक्तव्य आमच्यासाठी धक्का

निवडणुकीत आम्ही लढलेल्या जागांपैकी 70 टक्के जागा लोकांनी आम्हाला दिल्या. जे काम आम्ही केले त्या कामाची पावती महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. प्रामाणिकपणे सरकार चालले त्या विश्वासातून जनतेने आम्हाला पुन्हा कौल दिला. अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असतील, मात्र निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, सरकार स्थापनेचे सगळे मार्ग खुले आहेत. लोकांनी महायुतीला मतदान केले होते. त्यामुळे हे वक्तव्य आमच्यासाठी धक्का होते. मी पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले होते, पण गेले 15 दिवस ज्या प्रकारची वक्तव्ये या महाराष्ट्रात माध्यमांमधून आपल्याला पाहण्यास मिळाली, ते दुर्दैवी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

युती तुटली नाही, अजूनही चर्चेसाठी तयार

आम्ही महायुतीसाठी अद्यापही तयार आहेत. त्यामुळे युती तुटली आहे, असे मी म्हणणार नाही. आमची खंत मात्र दूर व्हायला हवी. त्यानंतर शिवसेनेशी चर्चा होईल. आम्ही अजूनही चर्चेसाठी तयार आहोत. त्यामुळे आमच्यातील मतभेद दूर झाल्यास मिळून सरकार स्थापन करू, असे शेवटी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सर्वांचे आभार! येत्या काळात भाजपचेच सरकार राज्यात येईल

पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार आम्ही चालवले. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले. महाराष्ट्रासमोर आलेल्या विविध संकटांचा सामना अत्यंत समर्थपणे केला.

महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी गेली पाच वर्षे दिली त्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. माझ्यासोबत ज्यांनी काम केले ते अधिकारी-कर्मचारी, आमच्यासोबत असलेले शिवसेना व अन्य घटक पक्ष, तसेच विरोधी पक्षांचेही मी आभार मानतो. येत्या काळात भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यपालांकडे मी राजीनामा सोपवला आहे. त्यांनी सांगेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करेन.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply