Breaking News

जमिनीची विक्री; आठ जणांवर गुन्हा

महाड : प्रतिनिधी

न्यायालयाने कोणताही व्यवहार करण्यास मनाई केलेल्या व जप्त केलेल्या जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी महाडमधील आठ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील व्यापारी इकबाल कासकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

महाड तालुक्यात जमिनीचे अनेक बनावट व्यवहार उघड होत असून, यामध्ये आणखी एका व्यवहाराची भर पडली आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यातील नांदगाव येथे सर्व्हे नंबर 385मध्ये असणारी दोन हेक्टर 24 गुंठे क्षेत्र असलेली जमीन बाबू झोरे यांच्याकडून खरेदी झाली होती. दरम्यान, या जमीनप्रकरणी इकबाल कासकर यांचे फोर सीझन फार्म लिमिटेड या कंपनीविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल होते. त्यानुसार न्यायालयाने कासकर यांच्या मालकीच्या जमिनीचे कोणतेही व्यवहार करू नयेत, असे आदेश बजावले होते व ही मिळकत जप्तही केली होती.

न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून जमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी महाडमधील जमीन दलाल अविकुमार धुळे यांच्या पत्नी वासंती धुळे, बाबू झोरे, मनोहर कळंबे, तसेच तत्कालीन तलाठी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कासकर यांनी दुसरी तक्रार केली आहे. त्यानुसार नांदगाव येथील गट नंबर 672, 617, 672, 674, 502, 693मधील दोन हेक्टर 35 गुंठे जागा कासकर यांनी खरेदी केली होती. या संदर्भामध्येही फोर सीझन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात न्यायालयात प्रकरण प्रविष्ट होते. या जमिनीच्या व्यवहारासही मनाई आदेश काढण्यात आला होता. तरीदेखील जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणात अविकुमार धुळे, लीलाबाई घाडगे, सुरेश वांगणे, मनोहर कळंबे, मेरी जेम्स, तसेच तत्कालीन तलाठी व अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा सर्व प्रकार 5 जून 2014 ते 8 नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये महाड दुय्यम निबंधक कार्यालय व नांदगाव येथे घडला. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. एम. गवारे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply