सराईत गुन्हेगार अटकेत
सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार
दिवसाढवळ्या घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलिसांनी पकडून सात लाख 27 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत भरदिवसा घरफोडीच्या घटना घडू लगाल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संजीवकुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, परिमंडळ-2चे उपायुक्त अशोक दुधे, सहाय्य्क आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश मोरे, निरीक्षक (गुन्हे) धुळबा धाकणे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून खबर्याकडून मिळालेल्या माहितीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरज जिलेदार सिंग या कॅटरिंगचा व्यवसाय करणार्यास सुरतहून आणि राबबन उर्फ इरफान कालिम शेख यास मुंबईतून अटक केली. या आरोपींना ताब्यात घेतल्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल सोन्याचे 240 ग्रॅम आणि चांदीचे 160 ग्रॅम दागिने हस्तगत करण्यात आले, तसेच आरोपींकडील गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही जप्त करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, हवालदार अनिल पाटील, बाबाजी थोरात, दीपक डोंगरे, महेश कांबळे, युवराज शिवगुंडे, दिगंबर सलगर, सचिन सरगर, अमोल कोळी यांनी या तपासात सहभाग घेतला.