Breaking News

कर्जत तालुक्यात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात, डोलकाठीचे भाविकांना आकर्षण

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा स्वरूपात साजरी करण्यात येते. किरवली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. किरवली – देऊळवाडी येथे देवाची डोलकाठी नाचविली जाते. त्याचे आकर्षण भाविकांना असते यंदासुद्धा तरुण ग्रामस्थांनी ही डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर, हातावर  ठेऊन नाचविली. नवसाला पावणार्‍या या दैवताचे दर्शन परिसरातील भाविकांनी मोठ्या

संख्येने  घेतले.

 भैरवनाथ मंदिराचे बांधकाम सुरु असल्याने किरवली-देऊळवाडी येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या परिसरात नवसाला पावणार्‍या व परिसराचे रक्षण करणार्‍या श्री भैरवनाथाची यात्रा मंगळवारी (दि. 12) पहाटे साडेचार वाजता काकड आरतीने सुरु झाली. त्यानंतर परिसरातील श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळाचे संगीत भजन झाले. सायंकाळी चारच्या सुमारास डोलकाठीची पूजा करण्यात आली.

परंपरेनुसार ढाक येथील चढण्या – उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून गरुड ध्वज आणला आणि काठीच्या तुर्‍यावर बांधला. या डोलकाठीची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन जैतु बडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर डोलकाठीचा मोर पिसार्‍याने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही तीस फुट उंचीची काठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेऊन बिपीन बडेकर, शत्रुघ्न बडेकर, विश्वनाथ बडेकर, प्रकाश तथा पप्पू बडेकर, विकास बडेकर, चिराग बडेकर, दिलीप सागर बडेकर, सुरेश बडेकर, सौरभ बडेकर आदींनी नाचवित नेली. ही वजनी डोलकाठी नाचविण्यासाठी ताकदीची गरज नसते तर अनुभवाची आवश्यकता असते.

डोलकाठी नाचवीत नाचवीत देऊळवाडी, बोरवाडी, किरवली येथे नेण्यात आली. त्या पाठोपाठ श्री भैरवनाथाची पालखी ओंकार भजन मंडळ आसरोटी – खालापूर यांच्या भजनी संगीतासह मिरवणुकीने नेण्यात आली. प्रत्येक घरी पालखीत असलेल्या श्री भैरवनाथाच्या मूर्तीची मनोभावी आरती व पूजा करण्यात आली.दिवेलागणीच्या सुमारास सुवासिनींनी उकडलेल्या पिठाचे दिवे सुपातून उडविले. श्री भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होती. पुत्रप्राप्तीसाठी केलेला नवस बालकांचा गुळाची तुला करून फेडण्यात येत होता. नवजात बालकांना श्री भैरवनाथाच्या पायाशी ठेऊन दर्शन घेण्यासाठी  गर्दी होती.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply