पाली : प्रतिनिधी
पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे, तसेच धार्मिक स्थळदेखील आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक खरेदी, शासकीय कामे करण्यासाठी तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी, रुग्ण दवाखान्यासाठी पालीत येतात. तीर्थक्षेत्र असल्याने पालीत भाविकांचा राबतादेखील नियमित असतो. मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे पालीत महत्वाच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधावीत अशी मागणी नागरिकांकडून
होत आहे.
पालीत बल्लाळेश्वर देवस्थानच्या वतीने भक्तनिवास क्रमांक 1 जवळ स्वच्छतागृह आहे. भाविकांबरोबरच जवळचे काही लोक व व्यवसायिक त्याचा वापर करतात. काही लोक बस स्थानकातील स्वच्छतागृहांचा वापर करतात. मात्र या स्वच्छतागृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. तिथे नियमित अस्वच्छता असते. पालीत दर्ग्यानजीक असलेल्या स्वच्छता गृहांची तर प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्याची सुधारणा केल्यास त्याचा वापर होण्यासारखे आहे.
पालीत किमान मोक्याच्या ठिकाणी तरी सार्वजनिक स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. असे दीपक पाटील (चोळे गांधे) या पर्यटकांनी सांगितले.
पालीत सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी नाही. जागा उपलब्ध झाल्यास आम्ही स्वच्छतागृहे उभारु. दाते किंवा कंपन्याकडून फायबरचे फिरते स्वच्छतागृह मिळविण्याचा प्रयत्न आहे.
-गणेश बाळके, सरपंच, पाली
पालीत सर्वात मोठी समस्या म्हणजे स्वच्छतागृहांचा अभाव. सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने बाहेरगावाहून आलेले लोक, पादचारी आणि भाविक यांचे हाल होतात. त्यामुळे पालीत किमान दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. -रोशन आंबेकर, व्यापारी, पाली