अलिबाग : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात माणगाव पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य 16 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
दुर्घटनेनंतर पोलिसांनी कंपनीचे मालक सुरेश शर्मा, संचालक अशोक कोटीयन आणि सचिन दरणे यांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहितेच्या कलम 304(अ), 285,336,337,338,34 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.