Breaking News

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नाही : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सरकार स्थापनेचे शिवसेना-भाजपला विचारा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचे सांगून पवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे आम्ही बोललोच नव्हतो. समन्वय समितीची बैठकही होणार नाही, मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतचा पेच अधिकच वाढला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (दि. 18) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर 50 मिनिटे चर्चा केली. या वेळी काँग्रेस नेते ए. के. अँटोनीही उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे सांगून आणखी संभ्रम वाढवला आहे. पवार म्हणाले की, सोनिया गांधींनी माझ्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. पाठिंबा देणारे आमदार आणि दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या जाणून घेतली. या बैठकीत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणासोबत जायचे? कुणासोबत चर्चा करायची? याबाबतचा कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही.

काँग्रेसचे दोन-चार नेते आणि राष्ट्रवादीचे दोन-चार नेते महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते सोनिया गांधी आणि मला त्यांचा दृष्टिकोन सांगतील. त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे ठरवू, असे पवार म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका होत असल्याने त्यावर आमच्या मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन आणि शेतकरी कामगार पक्षासोबत चर्चा करू. त्यांना विश्वासात घेऊ, असेही पवार म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसले, पण त्यांनी कोणताही किमान समान कार्यक्रम ठरवला नाही. आम्ही दोन्ही पक्षांनी निवडणूक जाहीरनामा तयार केला होता. त्यावर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम तयार करण्याबाबत आम्ही काहीच बोललो नव्हतो, असे सांगतानाच समन्वय समितीही स्थापन झाली नाही. त्यांची बैठकही होणार नाही. एक-दोन आमदार एकत्र भेटले म्हणून चर्चा होत नसते, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply